Satwiksairaj Chirag: लक्ष्यसह चिराग सात्त्विकही अंतिम फेरीत; हाँगकाँग ओपन बॅडमिंटन, सेनची लढत चीनच्या दुसऱ्या मानांकित खेळाडूशी
esakal September 15, 2025 02:45 AM

हाँगकाँग : भारताच्या लक्ष्य सेन याने जवळपास दोन वर्षांनंतर मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने तैपेईच्या चोऊ तिएन चेन याला सरळ गेममध्ये पराभूत केले. तसेच, पुरुष दुहेरीतील सात्त्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनेही हाँगकाँग ओपन स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली.

२३ वर्षीय लक्ष्य सेनने तब्बल ५६ मिनिटांच्या थरारक सामन्यात जागतिक क्रमवारीत नवव्या आणि तिसऱ्या मानांकित चोऊ २३-२१, २२-२० असे पराभूत केले.

लक्ष्यने याआधी जुलै २०२३ मध्ये कॅनडा ओपन (सुपर ५००) जिंकली होती. डिसेंबरमध्ये सैयद मोदी आंतरराष्ट्रीय (सुपर ३००) जिंकून त्याने शेवटचा किताब मिळवला होता. सध्या तो जागतिक क्रमवारीत २०व्या स्थानावर आहे. अंतिम फेरीत त्याचा सामना चीनच्या दुसऱ्या मानांकित ली शी फेंग याच्याशी होईल.

याआधी, पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावरील सात्त्विक-चिराग या जोडीने चिनी तैपेईच्या बिंग-वेई लिन आणि चेन चेंग-कुआन यांना २१-१७, २१-१५ अशा सरळ गेममध्ये पराभूत करून या हंगामातील पहिल्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भारतीय जोडीचा सामना चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग (पॅरिस ऑलिंपिक रौप्यपदक विजेते) यांच्याशी होईल.

Asia Cup 2025: इंग्लंड दौरा गाजवूनही शुभमन गिलला टीम इंडियात संधी मिळणार नाही! संजू सॅमसन ठरणार कारण?

चायना ओपनपासून आम्ही सात उपांत्य फेरी गाठल्या होत्या. सतत उपांत्य फेरी गाठत होतो आणि आम्हाला खूप दिवसांपासून अंतिम सामना खेळायचा होता. शेवटी संधी मिळाली. अजून एक सामना बाकी आहे; पण आम्ही खूप आनंदी आहोत, असे चिरागने सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.