Union Home Minister Amit Shah: सर्व भाषांचा आदर करावा; हिंदी दिवसाचे औचित्य साधत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
esakal September 15, 2025 01:45 PM

नवी दिल्ली / गांधीनगर: ‘‘जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांत हिंदीचा समावेश आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. गुजरातमधील गांधीनगर येथे रविवारी आयोजित राजभाषा संमेलनादरम्यान ते बोलत होते. सर्व भारतीय भाषांचा आदर करावा,’’ असे आवाहनही त्यांनी केले. \

माेठी बातमी! ‘सारथी शिष्यवृत्ती बंद’मुळे शिक्षण धोक्यात; अल्प उत्पन्न गटातील ७० हजार मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर परिणाम

‘‘भारत हा मुळात भाषा प्रधान देश आहे. पिढ्यान्पिढ्यांपासून आपल्या देशातील भाषा या आपली संस्कृती, इतिहास, परंपरा, ज्ञान-विज्ञान, दर्शन आणि अध्यात्माला पुढे घेऊन जाण्याचे समर्थ माध्यम ठरल्या आहेत. हिमालयापासून ते दक्षिणेतील समुद्रापर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत भारतीय भाषांनी प्रत्येक परिस्थितीत संवाद आणि अभिव्यक्तीच्या माध्यमातून लोकांना संघटित केले आहे. भारतीय भाषांनी प्रत्येक वर्ग आणि समुदायाला अभिव्यक्तीची संधी दिली आहे. तमिळनाडूची ओवियालूचा आवाज असो, पूर्वेकडील बिहू असो, पंजाबचे लोहडी गीत असो, बिहारच्या विद्यापतीची पदावली असो, बंगालच्या बाउल संतांचे भजन असो, या सर्वांनी संस्कृतीला जिवंत आणि लोककल्याणकारी बनवले आहे,’’ असे अमित शहा यांनी सांगितले.

‘‘आपल्या देशातील भाषा या परस्परांना पूरक आहेत. त्या देशाला एकतेच्या सूत्रात बांधतात. संत तिरुवल्लुवर, कृष्णदेवराय, सुब्रमण्यम भारती, गोस्वामी तुलसीदास, संत कबीर, सूरदास, श्रीमंत शंकरदेव, महापुरुष माधवदेव आणि भूपेन हजारिका या सर्वांच्या रचना देशाच्या कानाकोपऱ्यात सन्मानित आहेत आणि त्या गुणगुणल्या जातात,’’ असे शहा म्हणाले. हिंदीला मान्यताप्राप्त भाषा म्हणून ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. राष्ट्रभाषा विभागाने मागील ५० वर्षांत हिंदीला जनतेची भाषा बनवण्यासाठी अद्भुत कार्य केले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

छत्रपती शिवरायांचा उल्लेख

‘‘छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या लढ्यात प्रामुख्याने स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा या तीन गोष्टींचा अंतर्भाव होता,’’ असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले. या तीनही गोष्टी परस्परांशी जोडल्या गेल्या असून त्या सर्व देशाच्या अस्मितेशी जोडल्या गेल्या आहेत, असेही अमित शहा म्हणाले.

इतर भाषांशी स्पर्धा नाही

हिंदी ही अन्य भारतीय भाषांची स्पर्धक नाही, ती त्यांच्या मैत्रिणीप्रमाणे आहे, असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले. याचे सर्वांत मोठे उदाहरण हे गुजरात आहे. गुजरातची मातृभाषा गुजराती असली तरी येथे हिंदीचा स्वीकार करण्यात आला. हिंदी आणि गुजरातीने सहअस्तित्व टिकून राहून येथे दोन्ही भाषांचा विकास झाला आहे, असे शहा म्हणाले.

Marathi Sahitya Sammelan:'मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी विश्वास पाटील'; साताऱ्यात एक ते चार जानेवारीदरम्यान रंगणार साहित्यप्रेमींचा मेळा केंद्राचे ऐतिहासिक पाऊल

केंद्र सरकारच्या वतीने गतवर्षी भारतीय भाषा विभागाची स्थापना केली. अशा पद्धतीच्या विभागाची स्थापना करणे हे ऐतिहासिक पाऊल आहे. ‘‘विविध साहित्य कागदपत्रे आणि अन्य दस्तावेजांचे भारतातील सर्व भाषांत सहज अनुवाद करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवत हा विभाग स्थापण्यात आला आहे,’’ असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.