IND W vs AUS W: ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या वनडेत दिली मात; विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना मिळवला विजय
esakal September 15, 2025 01:45 PM
  • ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात ८ विकेट्सने विजय मिळवला.

  • भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना फोबी लिचफिल्ड, बेथ मुनी आणि ऍनाबेल सदरलँड यांनी अर्धशतके केली.

  • ऑस्ट्रेलियाने महिला वनडेमध्ये हा विक्रमी विजय देखील ठरला

ऑस्ट्रेलिया महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर असून वनडे मालिका खेळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतीय महिला संघविरुद्ध होत असलेल्या वनडे मालिकेला विजयी सुरुवात केली आहे. मुल्लनपूरमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाला ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यात एकूण सहा खेळाडूंनी अर्धशतके केली. भारताकडून तीन, तर ऑस्ट्रेलियाकडून तीन अर्धशतके झाली. पण ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. त्यामुळे मालिकेत ऑस्ट्रेलिया महिला संघाने १-० अशी आघाडी घेतली.

IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २८२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने ४४.१ षटकात २ विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्ड, बेथ मुनी आणि ऍनाबेल सदरलँड यांनी अर्धशतके केली. ऑस्ट्रेलियाने ३५ चेंडू राखून हा विजय मिळवला.

त्यामुळे महिला वनडेमध्ये २५० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक चेंडू राखून विजय मिळवण्याबाबतीत ऑस्ट्रेलियाचा हा दुसऱ्या क्रमांकाचा विजय ठरला. पहिल्या क्रमांकावरही ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे संयुक्तरित्या आहेत.

ऑस्ट्रेलियाने ब्रिस्टोलमध्ये २०१७ मध्ये २५८ धावांचा पाठलाग ३७ चेंडू राखूप पूर्ण केला होता, तर झिम्बाब्वेने आयर्लंडविरुद्ध २०२१ मध्ये २५४ धावांचा पाठलाग ३७ चेंडू राखून पूर्ण केला होता.

याशिवाय महिला वनडेमध्ये सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग करण्यामध्येही ऑस्ट्रेलियाचा हा विजय चौथ्या क्रमांकावर आला आहे.

यापूर्वी श्रीलंकेने सर्वाधिक ३०२ धावांचा यशस्वी पाठलाग २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध २०१२ मध्ये २८९ धावांचा आणि भारताविरुद्धच ऑस्ट्रेलियाने २०२३ मध्ये २८३ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

ऑस्ट्रेलियाचा विजय

ऑस्ट्रेलियाकडून सलामीला कर्णधार ऍलिसा हेली आणि फोबी लिचफिल्ड फलंदाजीला उतरल्या होत्या. या दोघींनी आक्रमक सुरुवात केली होती. पण ७ व्या षटकात हेलीला क्रांती गौडने त्रिफळाचीत केले. हेलीने २३ चेंडूंत ५ चौकारांसह २७ धावा केल्या.

ती बाद झाल्यानंतर एलिस पेरी लिचफिल्डला चांगली साथ देत होती. त्यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारीही झाली. मात्र २० व्या षटकादरम्यान पेरी पायात क्रॅम्प आल्याने लंगडताना दिसली. त्यामुळे तिला रिटायर्ड हर्ट होत माघारी परतावे लागले. तिने ३८ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह ३० धावा केल्या.

IND A vs AUS A: विराट, रोहित यांची फक्त हवा... ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रजत पाटीदार कॅप्टन

ती बाहेर गेल्यानंतर बेथ मुनीने भक्कम साथ लिचफिल्डला दिली. या दोघींनीही खराब चेंडूचा समाचार घेताना डाव पुढे नेला. लिचफिल्डने अर्धशतक पूर्ण केले होते. त्यामुळे २५ षटकापर्यंतच ऑस्ट्रेलियाने १५० धावांचा टप्पा पार केला होता.

अखेर लिचफिल्डचा अडथळा २७ व्या षटकात स्नेह राणाने दूर केला. तिने बदली क्षेत्ररक्षक अरुंधती रेड्डीच्या हातून तिला बाद केले. लिचफिल्डने ८० चेंडूत १४ चौकारांसह ८८ धावांची खेळी केली. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाने विकेट गमावली नाही.

मुनीला ऍनाबेल सदरलँडची साथ मिळाली. या दोघींनी नाबाद ११६ धावांची भागीदारी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. बेथ मुनी ७४ चेंडूत ९ चौकारांसह ७७ धावांवर नाबाद राहिली, तर ऍनाबेल सदरलँडन ५१ चेंडूत ६ चौकारांसह ५४ धावा केल्या.

तत्पुर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ७ बाद २८१ धावा केल्या. भारताकडून प्रतिका रावलने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली, तर स्मृती मानधनाने ५८ धावांची खेळी केली. हर्लिन देओलनेही ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. ऋचा घोषने २५ धावा केल्या. पण बाकी कोणाला खास काही करता आले नाही.

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना मेगन शटने २ विकेट्स घेतल्या, तर किम गार्थ, ऍनाबेल सदरलँड, ऍनला किंग आणि ताहलिया मॅकग्रा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

FAQs

प्रश्न १: भारत - ऑस्ट्रेलिया महिलांच्या पहिल्या वनडेमध्ये कोणता संघ विजयी ठरला?

उत्तर: ऑस्ट्रेलिया महिला संघाने ८ विकेट्सने विजय मिळवला.

(Who won the 1st ODI?)

प्रश्न २: भारताने किती धावा केल्या?

उत्तर: भारताने ५० षटकांत ७ बाद २८१ धावा केल्या.

(How many runs did India Women score?)

प्रश्न ३: भारताकडून कोणत्या खेळाडूंनी अर्धशतके केली?

उत्तर: प्रतिका रावल, स्मृती मानधना आणि हर्लिन देओल यांनी अर्धशतके केली.

(Which Indian players scored fifties?)

प्रश्न ४: ऑस्ट्रेलियाकडून कोणत्या खेळाडूंनी अर्धशतके केली?

उत्तर: फोबी लिचफिल्ड, बेथ मुनी आणि ऍनाबेल सदरलँड यांनी अर्धशतके केली.

(Which Australians scored fifties?)

प्रश्न ५: एलिस पेरीला काय झाले?

उत्तर: तिला पायात क्रॅम्प आल्याने रिटायर्ड हर्ट व्हावे लागले.

(What happened to Ellyse Perry?)

प्रश्न ६: या विजयानंतर मालिकेतील स्थिती काय आहे?

उत्तर: ऑस्ट्रेलिया महिला संघ १-० अशी आघाडीवर आहे.

(What is the series score after this match?)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.