आशिया कप स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यांचा थरार शिल्लक आहे. या सामन्यात पाकिस्तानसाठी करो या मरोची स्थिती निर्माण झाली आहे. तर भारताने सुपर 4 फेरीतील स्थान जवळपास पक्कं केलं आहे. दुसरीकडे, भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा उडवल्यानंतर गणित फिस्कटलं आहे. त्यामुळे आता युएईला देखील सुपर 4 फेरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही पाकिस्तान आणि युएई संघासाठी करो या मरोची लढाई आहे. 17 सप्टेंबरला पाकिस्तान आणि युएई यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी संघाला सुपर 4 फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांची विजयासाठी धडपड असणार आहे. या सामन्यात नेट रनरेटचं गणित काहीच कामाचं नाही. त्यामुळे विजय मिळवून थेट सुपर 4 फेरीचं तिकीट मिळवणं हेच समीकरण आहे. त्यामुळे या सामन्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.
पाकिस्तानने पहिल्या सामन्यात ओमानला पराभूत केलं होतं. त्यानंतर भारताकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे पाकिस्तानचा संघ गुणतालिकते 2 गुण आणि +1.649 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर युएईला पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. भारताने युएईचा दारूण पराभव केला होता. पण दुसऱ्या सामन्यात युएईने ओमानचा 42 धावांनी धुव्वा उडवला. यासह 2 गुण आणि -2.030 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि युएई या दोन्ही संघांना समान संधी आहे. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल आणि नेट रनरेटच्या जोरावर पाकिस्तान सुपर 4 फेरीत जाईल.
दुसरीकडे, सामनाधिकाऱ्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बहिष्काराची भूमिका घेतली आहे. पुढच्या सामन्यातून पायक्रॉफ्ट यांना हटवलं नाही तर सामना खेळणार नाही असं पाकिस्तानकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तान खेळलं नाही तर युएई फायदा होईल. युएईला फुकटात दोन गुण मिळतील आणि सुपर 4 फेरीत जागा मिळवेल. आता आयसीसी सामनाधिकाऱ्यावर कारवाई करते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.