Asia Cup 2025 : IND vs PAK पुन्हा भिडणार; सामना केव्हा? जाणून घ्या
Tv9 Marathi September 16, 2025 12:45 AM

टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेत रविवारी 14 सप्टेंबरला झालेल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत सलग दुसरा विजय मिळवला. या सामन्याला जोरदार विरोध करण्यात आला. मात्र त्यानंतरही हा सामना खेळवण्यात आला. भारताने या सामन्यात पाकिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. भारताने 128 धावांचं आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात 15.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. भारताने यासह सुपर 4 मधील आपलं स्थान निश्चित केलं.

टीम इंडिया या मोहिमेतील साखळी फेरीतील आपला तिसरा आणि आणि अंतिम सामना शुक्रवारी 19 सप्टेंबरला ओमान विरुद्ध खेळणार आहे. भारताला हा सामना जिंकून विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. अशात आता मोठी अपडेट समोर आली आहे. भारत-पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा या स्पर्धेत आमनेसामने येण्याची दाट शक्यता आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पुन्हा सामना होणार की नाही? हे 17 सप्टेंबरला निश्चित होईल. पाकिस्तान आपला साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना यूएई विरुद्ध खेळणार आहे. या सामन्याच्या निकालानंतर भारत-पाक मॅच होणार की नाही? हे स्पष्ट होईल.

दोन्ही संघ आमनेसामने केव्हा?

पाकिस्तानने साखळी फेरीत आतापर्यंत 3 पैकी 2 सामने खेळले आहेत. पाकिस्तानने ओमानवर मात करत विजयी सुरुवात केली. तर दुसर्‍या सामन्यात भारताकडून पराभूत व्हावं लागलं. तर पाकिस्तानचा सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी यूएई विरुद्ध 2 हात करणार आहे. पाकिस्तानसाठी सुपर 4 च्या हिशोबाने हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना जिंकला तर ते सुपर 4 साठी पात्र ठरतील.

अशा प्रकारे ए ग्रुपमधून भारत-पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्धी सुपर 4 मध्ये साखळी फेरीनंतर पुन्हा एकदा आमनेसामने येतील. सर्व समीकरणं जुळल्यास हा सामना रविवारी 21 सप्टेंबरला होऊ शकतो. त्यामुळे पाकिस्तान साखळी फेरीत दुसरा विजय मिळवणार की होम टीम यूएई उलटफेर करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

फायनलमध्ये दोन्ही संघ भिडणार?

दरम्यान फक्त सुपर 4 नाही तर दोन्ही संघ अंतिम फेरीतही आमनेसामने येऊ शकतात. सुपर 4 फेरीत प्रत्येक संघाला प्रत्येकी 3-3 सामने खेळायचे आहेत. या 3 पैकी सर्वाधिक सामने जिंकणारे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहचतील. त्यामुळे 2 शेजारी संघ टॉप 2 मध्ये राहिल्यास अंतिम फेरीत भारत-पाकिस्तान सामना होऊ शकतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.