सध्या सोशल मीडियावर आणि इतरत्र भारत-पाकिस्तान सामन्याची चर्चा आहे. टीम इंडियाने पाकिस्तानवर दणदणीत, शानदार विजय मिळवला ही समस्त भारतीयांसाठी आनंदाची बाब आहेच. पण सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये या मॅचभोवती जे सामाजिक, राजकीय कंगोरे आहेत, त्याची सुद्धा दखल घेणं गरजेच आहे. भारत-पाकिस्तान मॅच दोन्ही देशातील नागरिकांसाठी इमोशन्सचा विषय असतो, तर बाजारपेठेसाठी, क्रिकेट बोर्डासाठी बिझनेस असतो. देशी-विदेशी कंपन्या या सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांच्या भावनांवर स्वार होऊन आपला बिझनेस उद्देश साध्य करतात. 90 च्या दशकात किंवा अलीकडे 2011 पर्यंत भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल एक कुतूहल, उत्सुक्ता टिकून असायची. कारण दोन्ही टीम्सकडे तुल्यबळ खेळाडू होते. सचिन तेंडुलकर, वसीम अक्रम, वकार युनूस, अजय जाडेजा, राहुल द्रविड, सौरव गांगुली, अकिब जावेद, जावेद मियादाद सारखे खेळाडू भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची रंगत अजून वाढवायचे.
पण 2008-09 नंतर पाकिस्तानी क्रिकेट मागे पडत गेलं. याला जबाबदार आहे त्या देशाच लष्कर. लष्कराने भारताला नामोहरम करण्यासाठी दहशतवादाचा मार्ग अवलंबला. हा राक्षस काही काळाने त्यांच्यावरच उलटला. दहशतवादी देश अशी पाकिस्तानची इमेज बनली. त्या देशात अन्य मोठ्या संघांनी जाणं बंद केलं, भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका बंद झाल्या. पर्यायाने पाकिस्तानी क्रिकेट मागे पडत गेलं. पाकिस्तानकडे आज दर्जेदार क्रिकेटपटुंची वानवा आहे. कालच्या सामन्यात हेच दिसून आलं. दुसऱ्याबाजूला भारतीय क्रिकेटमध्ये जो पैसा आला, त्या बळावर BCCI ने जागतिक क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलच. पण पैशांच योग्य नियोजन करुन क्रिकेटच उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं. भारत आज उत्तोमतम क्रिकेटस घडवण्याची फॅक्टरी बनला आहे.भारत-पाकिस्तान क्रिकेटमधला हा फरक ठळकपणे दिसतोय.
अजूनही भारतीय ही जखम विसरलेले नाहीत
आजचा मुद्दा जो आहे तो, काल झालेल्या आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याचा आहे. कालच्या या सामन्याबद्दल भारतीय क्रिकेट चाहत्यांना तशीही फार उत्सुक्ता नव्हती. कारण भारत जिंकणार हे सगळ्यांना माहित होतं. उलट भारताने पाकिस्तान विरुद्ध खेळू नये, हीच सर्वत्र जनभावना होती. याला कारण आहे, चार महिन्यापूर्वी झालेला पहलगाम दहशतवादी हल्ला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी धर्म विचारुन विचारुन पत्नी आणि मुलांसमोर त्यांच्या वडिलांची हत्या केली होती. अजूनही भारतीय ही जखम विसरलेले नाहीत. म्हणूनच भारताने पाकिस्तान विरुद्ध खेळू नये असच सर्वांना वाटत होतं. पण द्विपक्षीय मालिका खेळायची नाही, पण बहुदेशीय स्पर्धांमध्ये रोखणार नाही हे कारण देऊन टीम इंडियाला परवानगी मिळाली.
जी वागणूक दिली ती योग्यच,पण….
या सामन्यावरुन काल जो वाद व्हायचा होता, तो झालां. भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात राजकीय आंदोलन झाली. काहींनी या सामन्यावर बहिष्कार टाकला. पण आज सर्वत्र चर्चा आहे ती, टीम इंडियाने मैदानावर पाकिस्तानला दिलेल्या वागणुकीची. सर्वप्रथम टॉसच्यावेळी कॅप्टन सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधारासोबत हस्तांदोलन केलं नाही. त्यानंतर सामना जिंकल्यावर टीम इंडियाने पाकिस्तानला भाव दिला नाही, हँडशेक केला नाही. ड्रेसिंग रुमचे दरवाजे बंद करुन घेतले. खरंतर टीम इंडियाने पाकिस्तान सारख्या देशाला जी वागणूक दिली, ती योग्यच आहे. पण काहीजण यावरुन टीम इंडियाने देशप्रेम दाखवून दिलं वैगेरे असं म्हणतायत.
सो टीकाही त्यांच्यावरच होणार
पण टॉसच्यावेळी सामना खेळणारच नाही, असं जर सूर्याने म्हटलं असतं तर तो पाकिस्तानसाठी पराभवापेक्षा पण मोठा धक्का ठरला असता किंवा हा सामना खेळायची गरजच नव्हती. आशिया कप स्पर्धेवर टीम इंडियाने बहिष्कार टाकला असता, तर बीसीसीआयच काय नुकसान झालं असतं? समुद्रातून एक लोटा पाणी काढलं, तर समुद्र सुकून जातो का? टीम इंडियाच फार आर्थिक नुकसान झालं नसतं. पण आपल्यासाठी काय महत्वाच आहे ते बीसीसीआयने दाखवून दिलं. पैसा आजचा उद्या कमावता येईल, पण गेलेली वेळ, प्रतिष्ठा परत येणार नाही. सूर्या आणि त्याच्या टीमने केलेल्या कृतीला देशप्रेमाचा कितीही मुलाला चढवला, तरी मूळात पाकिस्तान सोबत खेळायची गरज नव्हती. या एका टुर्नामेटने टीम इंडियाच काही बिघडलं नसतं. यात सूर्यकुमार यादव किंवा टीम इंडियाची चूक नाहीय. त्यांनी बीसीसीआयचा आदेश पाळला. पण शेवटी चेहरा त्यांचा आहे, सो टीकाही त्यांच्यावरच होणार.