महत्त्वाची अपडेट! राष्ट्रीय महामार्गावरील पश्चिमेकडील पूल वाहतुकीसाठी बंद होणार? पंचगंगा पुलावर दुहेरी वाहतुकीची चाचणी, पर्यायी मार्ग कोणते?
esakal September 16, 2025 09:45 AM

नागाव : पंचगंगा नदीवरील एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काल चाचणी घेतली. पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या (Pune-Bengaluru Highway) सहापदरीकरणात पंचगंगा नदीवरील महामार्गाच्या (Panchganga Bridge Traffic) पश्चिमेकडील पूल वाहतुकीसाठी बंद होणार आहे.

परिणामी नदीच्या दोन्ही बाजूला महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागणार आहेत. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा पोलिस प्रशासन यांच्यात एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यावरून मतभेद आहेत. पोलिस प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेतल्यास पुलाचे काम लवकर पूर्ण करता येईल. दरम्यान, एका पुलावरील वाहतूक बंद होणार असल्याने स्थानिक वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन महामार्ग प्राधिकरणाने केले आहे.

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये पंचगंगा नदीवरील पुलाचे काम सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ब्रिटिशकालीन पूल काढून टाकला आहे. तिथे नवीन पुलाचे काम सुरू होणार आहे. शिवाय पूर्वेकडील पूल २००४ साली महामार्गाच्या चौपदरीकरणात झाला आहे. त्यामुळे मध्यभागी असलेला पूल अस्तरीकरणासाठी आणि दुरुस्तीसाठी काही दिवस बंद करण्यात येणार आहे. परिणामी या पुलावरील वाहतूक पूर्वेकडील एकाच पुलावरून सुरू ठेवण्यात येईल.

मराठा-ओबीसी आरक्षणावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, 'हैद्राबाद गॅझेटचा शब्दनशब्द मी..', सरकारच्या निर्णयावरही केली टीका

सध्या तावडे हॉटेल, सांगली फाटा (पुलाची शिरोली), नागाव फाटा व शिरोली एमआयडीसीत पुलाची कामे सुरू आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत पंचगंगा नदीवरील एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू करणे धोकादायक ठरू शकते. परिणामी महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागणार आहेत. येणाऱ्या काही दिवसांत नवरात्रीमुळे कोल्हापूरला अंबाबाई दर्शनासाठी भाविकांची वर्दळ वाढणार आहे. त्यानंतर दीपावली सुटी आहे.

याचा विचार करून महामार्ग प्राधिकरणाने पुलावरील वाहतूक तत्काळ बंद करू नये, असे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे. तर महामार्गावरील वर्दळ कधीच कमी होणार नसल्याने आठ दिवसांचा वेळ मिळाल्यास आपण दोन्ही पूल सुरळीत सुरू करू, असा विश्वास महामार्ग प्राधिकरणाला आहे. एकूणच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही वाहतूक बंद होणार की नाही याबाबत संभ्रम आहे.

स्थानिक वाहनधारकांनी कोल्हापुरातून पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी कसबा बावडा मार्गाचा अवलंब करावा. तर कर्नाटकात जाणाऱ्यांसाठी विद्यापीठ मार्गे सरनोबतवाडीकडे जाता येऊ शकते. अशा पर्यायी मार्गांचा अवलंब करून वाहनधारकसुद्धा पंचगंगा नदी पुलावरील वाहतुकीची कोंडी टाळू शकतात, असे महामार्ग प्राधिकरणचे म्हणणे आहे.

पंचगंगा नदीच्या पुलावरील पश्चिमेकडे असणाऱ्या पुलाला एक्सेस जॉइंटर लावायचे आहेत. सध्या या पुलाचे खराब अस्तरीकरण आणि लोखंडी पट्ट्या वरती आल्यामुळे होणारी वाहतूक अतिशय संथ आहे. त्यामुळेही वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे प्राधिकरणाला आठ दिवसांचा वेळ मिळाल्यास पुन्हा पुलावरील वाहतूक सुरळीत होऊ शकते.

- चंद्रकांत भरडे, अभियंता, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

पोलिस प्रशासनाचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सहकार्य आहे. महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे होणाऱ्या अपघातात कुठेही प्राधिकरणाला दोषी ठरवलेले नाही. महामार्ग पोलिसांनीही महामार्गावरील वाहतुकीच्या कोंडीसाठी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.

- सुनील गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.