मायग्रेन म्हणजे प्रचंड डोकेदुखी, आणि हा एक अतिशय गुंतागुतींचा आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जवळपास एक अब्ज लोक या आजाराने त्रस्त आहेत.
हा एक असा आजार आहे ज्यामुळे डोकेदुखी इतकी तीव्र होते की रोजचं काम करणंसुद्धा कठीण होतं.
मायग्रेन केवळ डोकेदुखीपर्यंत मर्यादित नाही तर याचा मेंदूच्या सर्व कार्यपद्धतींवरही परिणाम होतो, असं अमेरिकेतील स्कॉट्सडेल येथील मेयो क्लिनिकमधील न्यूरॉलॉजिस्ट डॉ. अमाल स्टार्लिंग सांगतात
त्या म्हणाल्या, "मायग्रेनचा अटॅक आलेल्या व्यक्तीवर फक्त अॅस्पिरिन घेऊन उपचार करता येत नाहीत. झटक्यादरम्यान वेदना इतक्या वाढतात की मेंदूची कार्य करण्याची क्षमता प्रभावित होते."
महिलांमध्ये मायग्रेनचं वाढतं प्रमाणएका संशोधनानुसार 15 ते 49 वर्ष वयोगटातील महिलांमध्ये मानसिक समस्या निर्माण होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे मायग्रेन होय.
पुरुषांच्या तुलनेत महिला यामुळे अधिक प्रभावित होतात. जवळपास चारपैकी तीन रुग्ण महिला असतात.
जयपूर येथील सवाई मानसिंह रुग्णालयातील न्यूरॉलॉजी विभागाच्या वरिष्ठ प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ. भावना शर्मा सांगतात, "हार्मोनल बदल देखील मायग्रेनमागला ट्रिगर करु शकतात. हार्मोन्समधील चढउताराचा खोलवर परिणाम होतो आणि हे मायग्रेन वाढण्यामागचं कारण ठरू शकतं. महिलांमध्ये होणारे हार्मोनल बदल हे एक मारयग्रेनमागचं एक कारण आहे."
डॉ. शर्मा पुढे सांगतात, "याचं आणखी एक कारण म्हणजे महिलांची दुहेरी भूमिका - सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही, झोप पूर्ण होत नाही आणि त्यातून निर्माण होणारा ताण मायग्रेनला ट्रिगर करतो.
झोपेचा अभाव आणि ताण यामुळे मायग्रेनचा त्रास सतत होऊ शकतो. त्यामुळे रुग्णाच्या काम करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. हळूहळू डोकेदुखी वाढत जाते आणि अटॅकच्या शेवटच्या टप्प्यात डोळ्यांत धूसरपणा जाणवतो आणि अत्यधिक थकवा येतो. ही अवस्था इतकी वेदनादायी असते की रुग्णाला सतत चिंता असते की पुढचा अटॅक कधीही येऊ शकतो."
या भीतीमुळे येणाऱ्या दिवसांत काही काम करायचं असेल, किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर कसं जायचं याचं नियोजनही करता येत नाही.
मायग्रेनची लक्षणंमायग्रेनच्या अटॅकची लक्षणे टप्प्या-टप्प्यांने दिसून येतात.
डॉ. अमाल स्टार्लिंग सांगतात, "मायग्रेनच्या अटॅकमध्ये पहिल्या टप्प्यावर काही ना काही खायची इच्छा होते किंवा चिडचिड होते. थकवा जास्त येतो. जांभया येतात आणि मानेत वेदना सुरू होतात."
पहिल्या टप्प्यानंतर काही तासांनी तीव्र डोकेदुखी सुरू होते. डोकं दुखत असताना उजेडाचा त्रास होतो. शरीरात झिणझिण्या आल्यासारखं होतं. वास घेण्याची क्षमता प्रभावित होते, उलटी आल्याची भावना होते. मळमळ होऊ शकते.
स्टार्लिंग सांगतात की सर्व रुग्णांमध्ये ही सर्व लक्षणे असतीलच असं नाही. काही लोकांमध्ये यापैकी काहीच लक्षणं दिसतात.
मायग्रेनच्या लक्षणांच्या बाबतीत सुद्धा बराच गोंधळ आणि गैरसमज आहे. बरेचदा मान किंवा सायनसमुळे होणारी डोकेदुखी आणि मायग्रेनमध्ये यातला फरक लोकांना कळत नाही.
डॉ. अमाल स्टार्लिंग यांच्या मते, "अनेकदा रुग्णांमध्ये मायग्रेनची लक्षणे स्पष्ट आणि तीव्र नसतात. परंतु, डोकं गरगरणं हे मायग्रेनचं एक स्थायी आणि मुख्य लक्षण आहे. काही लोकांना असं वाटतं की कानात काही बिघाड झाल्यामुळे चक्कर येतात. मात्र कानाची टेस्ट केली तर त्यात लक्षात येतं की त्यात कोणतीही समस्या नाही."
"खरी समस्या अशी असते की कान जेव्हा मेंदूकडे सिग्नल पाठवतो तेव्हा मायग्रेनमुळे प्रभावित मेंदू ते व्यवस्थित प्रोसेस करू शकत नाही. त्यामुळे शरीरात असंतुलनामुळे अस्थिरता येते आणि डोके गरगरते."
"मायग्रेनवर वेळीच उपचार केले नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि मायग्रेन क्रॉनिक मायग्रेनमध्ये रुपांतरित होऊ शकतो. आतापर्यंत मायग्रेनसाठी विशेष औषध उपलब्ध नाही. दुसरं म्हणजे प्रत्येक रुग्णामध्ये वेगळ्या प्रकारचा मायग्रेन होतो. त्यामुळे कोणत्या औषधाने कोणाला लाभ होईल हे सांगता येत नाही."
मायग्रेनच्या वेळी शरीरात काय घडत असतं?डॉ. भावना शर्मा सांगतात की, मायग्रेनच्या वेळी मेंदू आणि मानेतून येणारे सिग्नल विचलित होतात.
यामुळे मेंदूतून काही प्रकारचे रसायने बाहेर पडतात जी डोक्याच्या नसांवर परिणाम करतात.
यापैकी एक महत्त्वाचे रसायन म्हणजे CGRP, जो थेट नसांवर परिणाम करतो आणि इथूनच वेदनेची सुरुवात होते.
जसजशी ही स्थिती वाढत जाते तसतसे मळमळ सुरू होते आणि प्रकाश आणि आवाजामुळे चिडचिड वाढते.
मायग्रेनची समस्या किती गंभीर आहे?मायग्रेनची समस्या आपल्याला वाटते त्यापेक्षा कितीतरी अधिक गंभीर आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात सुमारे एक अब्ज लोक मायग्रेनने ग्रस्त आहेत.
जागतिक संघटनेने मायग्रेनला जगातील सातव्या क्रमांकाचा सर्वाधिक अपंगत्व निर्माण करणारा आजार म्हणून स्थान दिलं आहे.
मायग्रेनच्या वेदनेवर काही उपाय आहे का?शांत आणि चांगली झोप आणि आराम हा मायग्रेनवरील नैसर्गिक उपाय आहे. याशिवाय औषधे, बोटॉक्स किंवा नर्व ब्लॉक सारख्या वैद्यकीय पद्धतीदेखील यात मदत करतात.
डॉ. भावना शर्मा सांगतात, महिलांनी उन्हात बाहेर पडताना सनग्लासचा वापर नक्की करावा.
त्यांच्या मते, मायग्रेनचा सामना करण्यासाठी दैनंदिन दिनचर्येत योग आणि ध्यान यांचा समावेश करणे आणि ताण कमी ठेवणे खूप महत्वाचे आहे.
कधी-कधी काही खाद्यपदार्थ किंवा परिस्थितीदेखील मायग्रेनला ट्रिगर करते.
डॉ. शर्मा म्हणतात की, पनीर, केळी, टोमॅटो, चॉकलेट, चहा आणि कॉफी हे असे घटक आहेत जे अनेक लोकांमध्ये वेदना वाढवू शकतात. म्हणून ज्यांना यामुळे त्रास होतो त्यांनी यापासून दूर राहिलेलंच बरं.
याव्यतिरिक्त "सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाश्ता करणे. हे केवळ शरीराला पोषणच देत नाही तर मायग्रेनच्या अवस्थेशी लढायलाही मदत करते."
मायग्रेनचा संबंध जेनेटिक्स आणि जीनोमिक्ससोबतही जोडला जातोय. वंशानुगत कारणे देखील असू शकतात असंही सुरुवातीच्या संशोधनातून दिसून आलं आहे.
योग्य आहारदेखील तितकाच महत्वाचा?चॉकलेटपासून ते चीजपर्यंत, आपण जे काही खातो-पितो त्याबाबत तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत.
जयपूर येथील सवाई मानसिंह रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. सुधीर महर्षी सांगतात, मायग्रेन ही मुळात मज्जातंतूंशी संबंधित समस्या आहे, पण काही खाद्यपदार्थ त्याचा प्रभाव वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात.
ते म्हणतात, "चॉकलेट, अल्कोहोल, बिअर, शुगर फ्री पदार्थ, प्रक्रिया केलेलं अन्न (प्रोसेस्ड फूड), जुने चीज, पनीर, कॉफी, चहा आणि इतर कॅफिनयुक्त पदार्थ मायग्रेनचा त्रास वाढवू शकतात. मात्र, चहा व कॉफीमुळे काहींना आरामदेखील मिळतो."
डॉ. महर्षी यांच्या मते, "खाद्यपदार्थांचा परिणाम वेगवेगळ्या व्यक्तींवर वेगवेगळा होतो. परंतु वेळेवर आहार न घेणे किंवा जेवणाची वेळ चुकवणे किंवा दिवसभराचा उपवास यामुळे देखील मायग्रेन होऊ शकतो."
डॉ. महर्षी सांगतात, "अपुरा-अयोग्य आहार आणि जीवनशैली हे देखील मायग्रेनचं कारण असू शकतं. त्यामुळे संतुलित आणि ताजा आहार आणि योग्य जीवनशैली महत्वाची आहे. हे उपाय मायग्रेनचा त्रास कमी करण्यास सहायक ठरू शकतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)