बेशिस्त वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई
esakal September 16, 2025 01:45 PM

पुणे, ता. १५ : पुणे ट्रॅफिक ॲपद्वारे (पीटीपी ॲप) तुम्ही स्वतः बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई घडवून आणू शकता. फक्त कोणी नियम मोडत असल्याचे छायाचित्र घ्या, ॲपवर अपलोड करा आणि पुढची जबाबदारी वाहतूक पोलिसांची! या ॲपच्या माध्यमातून नागरिकांनी आतापर्यंत ४२ हजार सातशे तक्रारी नोंदविल्या असून, त्यापैकी ३२ हजारांहून अधिक जणांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
काही दुचाकीस्वार मान वाकडी करून मोबाईलवर गप्पा मारतात. कोणी ट्रिपल सीट, कोणी सिग्नल तोडून पुढे निघतो. एखाद्या कारचालकाने सीट बेल्ट लावलेलाच नसतो. ‘नो पार्किंग’मध्ये गाडी उभी असते. काही ऑटो, टॅक्सी चालक भाडे घेण्यास नकार देतात. काळ्या काचांच्या (टिंटेड ग्लास) गाड्या रस्त्यावरून बिनधास्त फिरतात. पदपथावरून गाड्या चालविणे, कॉर्नरला वाहने लावणे, विरुद्ध दिशेने वेगाने येणारे चालक, वर्दळीच्या वेळी रस्त्यावर अवजड वाहने अशी दृश्ये दररोज दिसून येतात; पण यामुळे होणारे अपघात, होणारी जीवितहानी याकडे अनेकदा दुर्लक्ष होते.

एका क्लिकवर कारवाई
यापुढे असा प्रकार दिसल्यास नागरिकांनी छायाचित्र काढून ते पुणे ट्रॅफिक ॲपवर अपलोड करायचे आहे. तक्रार मिळताच वाहतूक पोलिस कारवाई करतील. शहरात असंख्य रस्ते असून, पोलिसांची संख्या मर्यादित आहे. अशावेळी नागरिकांची मदत पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आपत्कालीन मदतीसाठीही उपयोगी
या ॲपचा उपयोग केवळ दंडात्मक कारवाईसाठीच नाही. तर कोठे अपघात झाला असेल, रस्त्यावर तेल सांडले असेल, खड्डे पडले असतील, पाणी साचले असेल, झाड पडल्याास किंवा वाहतूक कोंडी झाल्यास नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. अशा वेळी ॲपमध्ये छायाचित्र अपलोड केल्यास पोलिस त्याठिकाणी पोहोचतील. तसेच, ॲपवर ट्रॅफिक अलर्ट, पार्किंगची ठिकाणे, चलन याचीही माहिती उपलब्ध होणार आहे.

पुणे ट्रॅफिक ॲपवर बेशिस्त वाहनचालकांचे छायाचित्र अपलोड केल्यास वाहतूक पोलिसांकडून संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. ॲपमुळे नागरिकांना स्वतः आणि इतरांना वाहतुकीची शिस्त पाळण्यास भाग पाडण्याचा अधिकार मिळाला आहे. शिस्त पाळल्यास अपघात कमी होतात आणि रस्त्यांवरील कोंडी कमी होते. नागरिकांनी या ॲपचा वापर करावा.
- हिंमत जाधव, पोलिस उपायुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.