सोनावेसह पाच गावातील नागरिकांना दिलासा
esakal September 16, 2025 11:45 PM

अखेर भुयारी मार्गाची मान्यता
सोनावेसह पाच गावांतील नागरिकांना दिलासा
पालघर, ता. १५ ः तालुक्यातील पूर्वेकडील सोनावे गावासह अनेक गावांना मुंबई-बडोदा महामार्गाने दुभाजले आहे. अलीकडे नागरिकांची घरे आणि पलीकडे शेती अशी स्थिती झाली आहे. शेतात जाण्यासाठी गाव सीमेपासून नागरिकांना चार ते पाच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत होते. यासाठी नागरिकांकडून भुयारी मार्गाची मागणी करण्यात आली होती. अखेर या कामाचे उद्घाटन सोमवारी (ता. १५) झाले आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
अलीकडच्या काळात पालघर जिल्ह्यातून मुंबई-बडोदे द्रुतगती महामार्ग प्रकल्पाचे काम झपाट्याने सुरू आहे. हे काम सुरू असताना पालघर तालुक्यातील सोनावे हे पश्चिमेकडील गाव तर महामार्गपलीकडील पूर्वेकडे नवघर घाटीम, करवाळे, उचावली, तांदूळवाडी, वाळू तलाव अशी गावे आहेत. या दोन्हीकडील गावांना जाण्या-येण्यासाठी भुयारी मार्ग अस्तित्वात नसल्यामुळे दारशेत येथून वळसा घालून यावे लागते. या प्रकारामुळे नागरिकांना वेळेसह अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे सोनावे येथे महामार्गखालून पादचारी भुयारी मार्गाची आग्रही मागणी शेतकऱ्यांनी दोन-तीन वर्षांआधी केली होती, मात्र प्रशासन दरबारी ही मागणी लालफितीत अडकली होती. गावकऱ्यांनी त्यांच्या समस्या शिवशक्ती सामाजिक संघटनेचे आणि श्रमिक कामगार सेनेचे नेते संजय पाटील यांच्याकडे मांडल्या. गावातील नागरिक आणि कामगार तसेच शेतकरीवर्ग यांच्या समस्या लक्षात घेत पाटील यांनी प्रशासन दरबारी बैठक लावण्याचे आयोजन केले.

भुयारी मार्गावरून संघर्ष
महामार्ग प्रकल्पातील उपजिल्हाधिकारी महेश सागर तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस आणि गावांचे सरपंच, संजय पाटील आणि नागरिकांसमवेत पार पडलेल्या बैठकीमध्ये भुयारी मार्गावरून काही काळ संघर्ष निर्माण झाला, मात्र नागरिकांच्या सोयीसाठी हा भुयारी मार्ग मंजूर करून देण्याची ग्वाही उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी नागरिकांना दिली. त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व सोपस्कार पार पाडत भुयारी मार्गाचा प्रस्ताव तयार करून त्याला मान्यता दिली.

तब्बल दीड महिन्याने मान्यता
बैठकीनंतर तब्बल दीड महिन्याने भुयारी मार्गासाठी मान्यता मिळाली आहे. या भुयारी मार्गाच्या कामाचा शुभारंभ सरपंच विशाल काकड, गावातील नागरिक या कामासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे दिनेश पवार आणि राष्ट्रीय प्राधिकरणाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत अलीकडेच पार पडले. भुयारी मार्ग तयार होणार असल्यामुळे दोन्ही बाजूकडील गावांना दिलासा मिळाला आहे.

फोटो : भुयारी मार्गाच्या कामाचा शुभारंभ नुकताच पार पडला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.