नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चातून सरकारवर हल्लाबोल करत नेत्यांनी कर्जमाफीचा नारा दिला. मोर्चानंतर नेत्यांनी केलेली भाषणे...
पैसे परत मिळवून देणार : सुळे
लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला एक हजार ५०० रुपयांचे आश्वासन देत सत्तेत बसलेल्या सरकारने आता २५ लाख महिलांची नावे कमी केली आहेत. त्यांना त्यांचा अधिकार परत मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिलांचा मोर्चा काढण्याचा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. सध्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफीची ही योग्य वेळ आहे. नाशिकमधील शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांनी शेतात काळे झेंडे लावले आहेत. दर तीन तासाला एक शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करत असल्याचेही त्यांनी सांगितले. एक महिन्यात देवाभाऊंच्या सरकारने कर्जमाफी केली नाही, तर ‘देवाभाऊ’च्या सरकारला राज्यात फिरू देणार नाही, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.
साहेब खडे, तो सरकार से बडे : शिंदे
ज्या सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान केले, त्यांचा तळतळाट लागल्याने भल्याभल्यांचे सरकार शेतकऱ्यांनी पाडले. जोपर्यंत राज्य सरकार सरसकट कर्जमाफी करत नाही, तोपर्यंत आपल्या सगळ्यांना हा लढा असाच सुरू ठेवावा लागणार आहे. ‘साहेब खडे तो सरकार से बडे’ असे म्हणत, शरद पवारच शेतकऱ्यांचे खरे कैवारी असून, ते कर्जमाफी मिळवून देणार, अशा विश्वास प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.
आश्वासनांची पूर्तता कधी : पाटील
मराठवाडा, विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. निवडणुकीत दिलेल्या आश्वसनाची पूर्तता होताना दिसत नाही. सातबारा कोरा करणार, अशी घोषणा दिली; परंतु अद्याप वचनपूर्ती झालेली नाही. शेतकरी अस्मानी, सुलतानी अशा दोन्ही संकटांना तोंड देत आहे. शरद पवार हेच आपल्याला कर्जमाफी मिळवून देतील, अशी अपेक्षा शेतकरी वर्गात आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी हा महाआक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
देवाभाऊ नाही मेवाभाऊ : रोहित पवार
राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असताना सरकार दलालबाज झाले आहे. यात मुख्यमंत्री देवाभाऊ नसून ते ‘मेवा’भाऊ आहेत. कर्जमाफी, रोजगार, हमीभाव, अतिवृष्टी असे अनेक प्रश्न समोर असताना हे सरकार ठोस निर्णय घेऊ शकत नाही. सरकारला सत्तेचा माज आला असून, हा माज आपल्याला उतरवावा लागेल. त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. कर्जमाफीसाठी वाघाचे जिगर लागते आणि ते फक्त पवार साहेबांजवळ आहे. जीएसटीच्या माध्यमातून लूट सुरू असून, कर्जमाफी करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही का, असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.
चेहरे बघून पंचनामे करू नका : टोपे
अतिवृष्टी, ढगफुटी, सततच्या पावसामुळे ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी हात उंचावून सांगावे, की ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशा घोषणा त्यांनी दिल्या. सरसकट पंचनामे करा, चेहरा बघून पंचनामे करू नयेत, अशी मागणी माजी मंत्री राजेश टोपे यांनी केली.
सरकारला जागे करण्याची वेळ : भगरे
शासनाचे धोरण शेतकरीविरोधी असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कर्जमाफी मिळालीच पाहिजे. झोपलेल्या सरकारला जागा दाखविण्याची हीच योग्य वेळ असून, त्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा सुरू ठेवण्याचे आवाहन खासदार भास्कर भगरे यांनी केले.
ये तो ट्रेलर है...: नीलेश लंके
आक्रोश मोर्चा म्हणजे ‘ये तो ट्रेलर है... पिक्चर अभी बाकी है’. शेतकऱ्यांना दूध, कांदा, द्राक्षभाव मिळालाच पाहिजे. झोपलेल्या सरकारला इशारा आहे, त्यांनी तत्काळ मदत करावी, अन्यथा त्यांच्याविरोधात जनता उभी राहील, असा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला.
कापूस उत्पादक अडचणीत : देशमुख
परदेशातून कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क हटवून सरकारने कापूस उत्पादकांना अडचणीत टाकले आहे. त्यांना मिळणारा भावही आता कमी होईल. तसेच इतर धान्यालाही भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्यआश्वासनांचे गाजर : नीतेश कराळे
राज्य सरकारने शेतकऱ्यांना गाजर दाखवले. तीन वेळा कर्जमाफी देऊ म्हणाले, पण एकदा तरी कर्जमाफी करून दाखवा. एक रुपयाचा पीकविमा यांनी हजारांवर नेला. त्यातही आता पीककापणी प्रयोगाच्या आधारे भरपाई केली जाणार आहे. ही संतांची भूमी आहे आणि संत सांगून गेले, ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. पण आपल्याला आश्वासनांचा विसर पडल्याची टीका नीतेश कराळे यांनी केली.