बीड जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसाने धुमाकूळ घातला असून नद्या-नाल दुथडी भरून वाहत आहेत.
यासह मराठवाडा आणि विदर्भाला पावसाने झोडपले असून उभी पिके पाण्याखाली गेली आहेत.
बीड जिल्ह्यात 15 तारखेला झालेल्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक गावे जलमय झाली आणि काही तासांतच शेकडो कुटुंबे अडकून पडली. या आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देत भारतीय लष्कराने नागरी प्रशासनाच्या समन्वयाने व्यापक बचाव मोहीम हाती घेतली आहे.
दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स ब्रिगेड मधील लष्करी विमानदलाची हेलिकॉप्टर्स अल्पावधीतच पाचारण करण्यात आली. प्रतिकूल हवामान व कठीण उड्डाण परिस्थितीला तोंड देत वैमानिकांनी दुर्गम व जलमग्न भागांत प्रवेश करून अडकलेल्या नागरिकांची सुटका केली.
महिलांसह मुले व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असून, सततच्या उड्डाणांद्वारे बचाव कार्य अखंडपणे सुरू आहे.
बीड जिल्ह्यामध्ये पावसाची परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं तसंच इतर शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड, किनगाव राजा परिसरातील अनेक गावात काल (15 सप्टेंबर) ढगफुटी सदृश पाऊस झाला. किनगावराजा गावाला पाण्याचा वेढा होता.
पाताळगंगा नदीला महापूर आला असून तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे, शेतातील उभी पिके पाण्यात गेल्याने मोठ नुकसान झालं आहे.
इंदापूर तालुक्यात पावसामुळे पूरस्थिती, कृषिमंत्र्यांकडून पाहणीइंदापूर तालुक्यात 14 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सणसर नाल्याला पूर आला. यामुळे शेतीचे आणि ओढ्यालगत असलेल्या घरांचे नुकसान झाले.
15 सप्टेंबर रोजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर तालुक्यातील पूरपरिस्थितीची पाहणी केली. सणसरमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन कृषी आणि महसूल विभागाला नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले.
कृषिमंत्री भरणे म्हणाले, "इंदापूर तालुक्यात कमी वेळेत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे सणसर भागात पूरस्थिती निर्माण झाली. भविष्यात अभी परिस्थिती टाळण्यासाठी ओढ्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम करण्यात येईल. लवकरच हे काम मार्गी लावू."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.