विज्ञान, शेती, माती, संस्कृती जपणारे अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे कण होते?, असा आहे 'शिवार ते शास्त्रज्ञ' प्रवास
esakal September 17, 2025 08:45 PM

Rural Scientist India : मी कुलगुरूपदी कार्यरत असताना कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षण मिळावे, या उद्देशाने विद्यापीठात तंत्रज्ञान अधिविभाग सुरू करण्याचा निर्णय अधिकार मंडळांच्या माध्यमातून घेतला. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात कामगिरी केलेल्या, योगदान देणाऱ्या डॉ. भोजे यांचे मार्गदर्शन घेण्याचे ठरविले.

श्री. भोजे सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये स्थायिक झाले होते. त्यांना विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार म्हणून मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यांनी या विनंतीचा स्वीकार करून २००६ मध्ये शैक्षणिक सल्लागार म्हणून काम सुरू केले. त्यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून दक्षिण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अद्ययावत आणि अधिक चांगल्या पद्धतीने तंत्रज्ञान विद्याशाखेचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने तंत्रज्ञान अधिविभागाच्या उभारणीचे काम हाती घेतले.

त्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता प्राप्त करण्यापासून या विभागाची इमारत आणि अन्य शैक्षणिक सुविधांसाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मिळविणे, अभ्यासक्रम, संशोधनाला वेगळी दिशा देणे, अशा प्रत्येक टप्प्यांवर योगदान दिले. त्यातून या विभागासह विद्यापीठ संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांतील शिक्षणात समन्वय, सुसूत्रता आणि तेथील संशोधनाला चालना मिळाली. तंत्रज्ञान शिक्षणासह विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होण्यासाठी ‘प्लेसमेंट सेल’ ला नवी दिशा देण्याची कामगिरी त्यांनी केली. शैक्षणिक सल्लागार म्हणून त्यांची दोन वर्षांची कारकिर्द विद्यापीठासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील करारासाठी आग्रही

जागतिक पातळीवरील शिक्षण, संशोधन शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांसमवेत सामंजस्य करार करण्यासाठी डॉ. भोजे हे आग्रही होते. त्यादृष्टीने त्यांनी विद्यापीठाशी दक्षिण कोरिया, थायलंड, आदी देशांतील विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांना जोडली.

‘दक्षिण महाराष्ट्राची ज्ञानगंगा असलेल्या शिवाजी विद्यापीठात पंधरा वर्षांपूर्वी तंत्रज्ञान विद्याशाखेतील शिक्षणाचा पाया रचण्याचे काम शैक्षणिक सल्लागार म्हणून ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांनी केले. उत्तम दर्जाचे टेक्नोक्रेट घडविण्याच्या उद्देशाने त्यांनी विद्यापीठात तंत्रज्ञान अधिविभागाची सुरूवात करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

-डॉ. माणिकराव साळुंखे, माजी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

अल्प परिचय

नाव ः डॉ. शिवराम बाबूराव भोजे

जन्म ः ९ एप्रिल १९४२, कसबा सांगाव, ता. कागल

प्राथमिक शिक्षण - दादासाहेब मगदूम हायस्कूल, कसबा सांगाव

महाविद्यालयीन शिक्षण ः राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर

उच्च शिक्षण ः बी. टेक, पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून १९६५ मध्ये.

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

महत्वाचे योगदान

फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टर (FBTR) या प्रकल्पाचा डिझाईन, बांधकाम व ऑपरेशन, तसेच नवे इंधन (carbide fuel) वापरणे

FBTR मध्ये जनरेट केलेली वीज, तिचे ऑपरेशनल स्तर वाढविणे व रिॲक्टरच्या कोअर डिझाईन हा त्यांच्या कार्याचा भाग

पुरस्कार आणि सन्मान

१९९२ ः वैश्विक इंडस्ट्रियल पुरस्कार

२००३ ः विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पद्मश्री

२००६ ः एच. के. फ्लोरीडा पुरस्कार

२०१३ ः डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूरच्या वतीने डी. एस. (डॉक्टर ऑफ सायन्स) पदवीने सन्मान

सर विश्वैश्वरैय्या स्मृती पुरस्कार

२०२० ः सांगलीतील ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील फोरमकडून “कर्मयोगी” पुरस्काराने सन्मान

ISRO Scientist : दुर्दैवी अपघात, ‘इस्रो’ वैज्ञानिकासह आई-वडील ठार

आंतरराष्ट्रीय सहभाग

इंटरनॅशनल ॲटोमिक एनर्जीच्या विविध समित्यांवर भारताचे प्रतिनिधीत्व फ्रान्स, रशिया, जपान, अमेरिका येथील फास्ट ब्रीडर रिॲक्टर डेव्हलपमेंट प्रकल्पांशी भारताची तुलना व सहकार्य वाढवले. भारताच्या ब्रीडर कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविले २०० हून अधिक वैज्ञानिक पेपर्स, अहवाल प्रकाशन

सेवानिवृत्तीनंतर...

कोल्हापूर येथे स्थायिक, शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार म्हणून काम

स्थानीय गाव-परिसरातील विकासासाठी सामाजिक कार्यात सहभाग

‘आम्ही सांगावकर’ नावाच्या ग्रामीण विकास संस्थेची स्थापना

कारकिर्द

भाभा अणुसंशोधन केंद्र ट्रॉम्बेमध्ये प्रशिक्षण. त्यानंतर वैज्ञानिक अधिकारी म्हणून कामास प्रारंभ

फ्रान्समध्ये येथे एक वर्षाच्या प्रतिनियुक्तीवर नियुक्ती. तेव्हा १३ एमडब्ल्यु फास्ट ब्रीडर टेस्टन रिॲक्टरच्या डिझाईन टीममध्ये सहभाग

१९७१ मध्ये परत भारतात. इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटोमिक रिसर्च येथे (आयजीसीएआर) येथे फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टर च्या असेंब्ली डिझाईनच्या कार्यात सहभाग

१९८८ मध्ये फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टरचे (एफबीटीआर) अधीक्षक.

पुढे एफबीटीआरच्या पॉवर वाढवण्याच्या कार्यात सहभाग

प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टरच्या पूर्व-डिझाईन, इंजिनिअरिंग व आर अँड डी सुरक्षितता निकष इत्यादींची जबाबदारी बजावली.

नोव्हेंबर २००० ते एप्रिल २००४ पर्यंत ते इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटोमिक रिसर्चचे संचालक.

डॉ. शिवराम भोजे यांच्या निधनाने भारत एका ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञाला मुकला आहे. त्यांनी अणुशास्त्रज्ञ म्हणून केलेले काम देशाच्या प्रगतीत मैलाचा दगड ठरले आहे. आज आपण ‘मेक इन इंडिया’ची चर्चा करत असलो तरी डॉ. भोजे यांनी सुरू केलेली ‘फास्ट ब्रीडर टेक्नॉलॉजी’ ही खऱ्या अर्थाने स्वदेशी उपलब्धी ठरली. विविध आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

- प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री

ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे हे कागल तालुक्याचे सुपुत्र आहेत, याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. त्यांच्या निधनामुळे भारत देश एका अभ्यासू आणि कर्तबगार अणुशास्त्रज्ञ संशोधकाला मुकला आहे. भारतमातेसाठी त्यांनी अणुभट्टी तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये ४० वर्षांहून अधिक महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा समितीचे सदस्य म्हणून त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय सेवा व योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

- हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री

ज्येष्ठ भारतीय अणुशास्त्रज्ञ आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी शैक्षणिक सल्लागार पद्मश्री डॉ. शिवराम बाबूराव भोजे यांच्या निधनामुळे शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डॉ. भोजे यांनी भारताच्या अणुशक्ती क्षेत्राच्या विकासासाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी व संशोधक प्रेरित झाले. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, संशोधन आणि समाजासाठी व्यापक योगदान देणारा एक दीप मालवला आहे. विद्यापीठ परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

- डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.