पुणे : ससून रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागाच्या सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी बाह्यरुग्ण विभागाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेले हे नूतनीकरण येत्या तीन ते चार महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर जवळपास २५ प्रकारच्या बाह्यरुग्ण सेवा रुग्णांना एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होणार आहे.
रुग्णालयात दररोज दीड ते दोन हजार रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा मिळाव्यात, या उद्देशाने रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाचे नूतनीकरण वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले. मात्र, अद्याप काम पूर्ण झाले नसून आणखी तीन-चार महिने लागण्याचा अंदाज वर्तविला जात असल्याने नवीन बाह्यरुग्ण विभागासाठी वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे सध्याचा बाह्यरुग्ण विभाग विखुरलेल्या स्वरूपात आहे. हे नूतनीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असून, त्यांनी बाह्यरुग्ण विभागाचा अंतिम आराखडा तयार केला आहे.
यामध्ये अस्थिरोग, मेडिसीन, आयुर्वेद आणि श्वसनरोग विभाग या विभागांचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे; तर शस्त्रक्रिया, स्त्रीरोगतज्ज्ञ व प्रसूती विभाग, हृदयशस्त्रक्रिया या विभागांचे नूतनीकरण बाकी आहे, अशी माहिती ससून प्रशासनाकडून देण्यात आली. नवीन बाह्यरुग्ण विभागात डिजिटल स्वरूपात विभागांची तसेच रुग्णांना आवश्यक असणारी इतर माहिती दर्शनी भागात लावली जाणार आहे.
रुग्णांसाठी प्रतीक्षा कक्षही तयार करण्यात येणार आहे. याशिवाय, त्वचारोग, कान-नाक-घसा, बालरोग, लसीकरण, यलो फीव्हर, ह्रदयरोग, मानसोपचार आदी बाह्यरुग्ण विभाग असणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव यांनी दिली.
बाह्यरुग्ण विभागाचे नूतनीकरण सध्या अंतिम टप्प्यात आहे. पुढील तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. काम पूर्ण झाल्यावर सर्व सेवा एकाच छताखाली येतील.
- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय