ढिंग टांग : शुभेच्छांची शर्यत..!
esakal September 17, 2025 08:45 PM

स्थळ : अज्ञात. वेळ : मध्यरात्री वेषांतराची. पात्रे : तीन!

दादासाहेब : (अंधाऱ्या रिकाम्या खोलीत प्रवेश करत) कुणी आहे हितं, की मीच पहिला?

भाईसाहेब : (अंधारातून) मी आधीच येऊन बसलोय! या की आत!!

दादासाहेब : (खुर्चीत स्थानापन्न होत) अर्जंट मीटिंग लावली म्हणून आलो, नाहीतर मला एका शिबिराला जायचंय उद्या सकाळी!

भाईसाहेब : (च्युइंगम चघळत) मी तर एका शिबिराहून आलो, आणि आपली मीटिंग झाली की लग्गेच दुसऱ्या शिबिराला पळणार! उद्याच्या दिवसभरात तर डझनभर आरोग्य शिबिरं आहेत!

दादासाहेब : (हात झटकत) कशापायी इतकं रक्त आटवताय?

भाईसाहेब : (खुलासा करत) आटवतोय कुठं? जमा करतोय! आरोग्य खातं आमच्याकडे आहे ना!!

नानासाहेब : (घाईघाईनं प्रवेश करत) सॉरी, जरा उशीर झाला! उद्याच्या शिबिरांचं टाइमटेबल ठरवत होतो, त्यात खूप वेळ गेला…

दादासाहेब : (नेहमीच्या करड्या आवाजात) कोण तुम्ही? हिकडं काय काम काढलं? दिसत नाही का? मीटिंग चालू आहे ते? इतकी डेरिंग वाढली का? मी ॲक्शन घेईन!! कोण आहे रे तिकडे?

नानासाहेब : (घाईघाईत खुलासा करत) अहो, मीच आहे तुमचा पहाटेचा मित्र, नानासाहेब फडणवीस! मीटिंगसाठीच आलोय मीसुध्दा!!

भाईसाहेब : (खदाखदा हसत) हुडी घालून आलात, त्यामुळे आमच्या दादासाहेबांनी तुम्हाला ओळखलंच नाही! मला सवय आहे! हाहा!!

दादासाहेब : हल्ली आमचं हे असं फार होतं! उगाच डोकं तापतं, तिच्या- (जीभ चावत) ते जाऊ दे! मीटिंग का लावली ते आधी सांगून टाका! मला तेवढा वेळ नाही, खूप कामं आहेत!!

नानासाहेब : (उभं राहून हात जोडत) विश्ववंदनीय, प्रार्थनीय परमपूज्य श्री नमोजीसाहेबांचा उद्या वाढदिवस आहे! नमो नम:!!

दादासाहेब आणि भाईसाहेब : (तटकन उठून उभे राहात एकाच सुरात) नमो नम:!!

नानासाहेब : (अभिमानाने) त्यांचा जन्मदिवस थाटामाटात साजरा करायचा संकल्प आहे! आम्ही तर सेवा पखवाडाच करतोय! पंधरा दिवस सेलेब्रेशन!!

भाईसाहेब : अहो, मध्ये नवरात्र येतंय!! कसं करणार?

दादासाहेब : (जोडलेले हात सोडून कमरेवर ठेवत) एकेक शुभेच्छा पत्र पाठवा आणि विषय संपवा!! उगाच कशाला आठवडा नि पंधरा दिवस घालवायचे!

नानासाहेब : (निर्धाराने) छे, छे असं कसं चालेल? आपण महायुती सरकारतर्फे त्यांना जबरदस्त भेटवस्तू पाठवू या!!

दादासाहेब : (पुन्हा हात जोडत) राज्याचा कर्जाचा बोजा वाढत वाढत नऊ लाखावर जातोय!

नानासाहेब : (संशयानं) कुणी सांगितलं?

दादासाहेब : (नरो वा कुंजरोवा स्टाइलने) असं विरोधक म्हणतायत, माझ्याकडे तरी तसा रिपोर्ट नाही!!

भाईसाहेब : (बेधडक) विरोधकांना नाही उद्योग! त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं? बाय द वे, मी माझी प्रायवेट गिफ्ट स्वतंत्र पाठवणार आहे! माझं आणि त्यांचं वेगळं गॉटमॅट आहे! ते तुम्हाला नाही कळणार!!

दादासाहेब : (हळूचकन) हे योग्य नाही! आमचे तटकरेजी सांगत होते की आपणही पत्र पाठवून शुभेच्छा देऊ!! त्यांनीही आपल्या वाढदिवसाला पत्रच पाठवलं होतं की! उगीच कशाला खर्च वाढवा?

नानासाहेब : (भक्तिभावाने) असं कसं? त्यांनी मला राजकीय जीवनाचं गुह्य शिकवलंय..! ती लाखमोलाची चीज नाही का?

दादासाहेब : (आयडिया सुचवत) ऐका माझं! एक मोठं होर्डिंग लावू, आणि थांबू!!

भाईसाहेब : (साळसूदपणे) काही दिवसांपूर्वी ‘देवाभाऊ’ ची होर्डिंगं गावभर लागलीच होती! ‘नमोभाऊ’ असं लिहिलेली!! नंबरी काम होईल! कसं?

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.