- प्रा. सुभाष शहाणे
सरकारी बँकांमध्ये सातत्याने हजारो कारकून आणि अधिकाऱ्यांची भरती होत असते. त्यासाठी प्रत्येक भरती बोर्डाची स्वतंत्र जाहिरात येते. उमेदवार त्यासाठी ऑनलाइन अर्ज करतात व ऑनलाइन परीक्षा देतात.
वाढते ऑनलाइन बँकिंग व्यवहार, डिजिटल पेमेंटस्, सायबर सुरक्षा तज्ज्ञांची मोठी मागणी, स्थानिक भाषेचे ज्ञान, छोट्या शहरातून शाखा विस्तार, ग्राहकांना थेट विक्री, मोठ्या प्रमाणावर सेवानिवृत्ती इत्यादीमुळे बँकेत मोठ्या प्रमाणावर भरती होत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ च्या दरम्यान या बँकांमध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा होणार आहेत. वेळीच पूर्वतयारी केल्यास यश मिळू शकते.
प्रक्रियेची वैशिष्ट्ये
कायमस्वरूपी सरकारी नोकरी. पूर्व व मुख्य परीक्षा गुणवत्ता यादीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक.
बँक क्लार्क भरतीसाठी फक्त लेखी परीक्षा द्यावी लागेल. मुलाखत चाचणी द्यावी लागणार नाही. मुलाखत फक्त अधिकारी पदासाठी घेण्यात येईल.
लेखी परीक्षा ही कॉम्प्युटरवर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी स्वरूपाची आहे.
परीक्षेचे टप्पे
या परीक्षेचे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि स्थानिक भाषा योग्यता चाचणी असे तीन महत्त्वाचे टप्पे आहेत. लेखी परीक्षेमध्ये ‘निगेटिव्ह मार्किंग’ होऊ शकते.
तयारी
उमेदवारांनी बँकेत नोकरी मिळविण्यासाठी पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी चांगली करावी. त्यासाठी दररोज किमान तीन ते चार तास अभ्यास करावा. या परीक्षेचा अभ्यासक्रम विषयानुसार लक्षात घ्यावा. त्यानुसार परीक्षेची पुस्तके, स्टडी मटेरिअल, मागील झालेल्या परीक्षांचे पेपर इत्यादींचा अभ्यास करावा.
त्याचप्रमाणे ऑनलाइन ट्रेनिंग प्लॅटफॉर्म, तज्ज्ञ शिक्षकांचे व यशस्वी झालेल्या उमेदवारांचे मार्गदर्शन घ्यावे. वेळ लावून मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. उत्तरामध्ये अचूकता ठेवावी. उमेदवारांनी वेग आणि अचूकतेला विशेष महत्त्व द्यावे. प्रचंड सराव करून शांत मनाने परीक्षेची पूर्वतयारी करावी.