आशिया कप स्पर्धेतील 10वा सामना पाकिस्तान आणि युएई यांच्यात होत आहे. पण हा सामना बऱ्याच कारणाने चर्चेत आला आहे. कारण सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट हे पुढच्या सामन्यात असतील तर पाकिस्तान खेळणार नाही असं तक्रारीत नमूद केलं होतं. पण आयसीसीने त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली. त्यामुळे पाकिस्तानवर नामुष्की ओढावली आहे. असं असताना या सामन्यापूर्वी आशियाई क्रिकेट परिषदेने एका पाऊल उचललं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने पाकिस्तान आणि युएई यांच्यातील सामन्याची ट्वीटर पोस्ट डिलिट केली आहे. त्यामुळे हा सामना होईल की नाही याबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. कारण पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. आता तक्रारीला केराची टोपली दाखवल्यानंतर पाकिस्तानने पुढचा सामना खेळणार नाही असा पवित्रा घेतल्याची चर्चा रंगली आहे.
आशियाई क्रिकेट परिषद ही सामन्यापूर्वी ट्वीटर हँडलवर त्या त्या सामन्याची पोस्ट टाकत असते. पण पाकिस्तान युएई सामन्याची पोस्ट डिलिट केल्याने संभ्रम वाढला आहे. पाकिस्तानचा संघ मैदानात जाण्यासाठी तसं पाहीलं तर फार वेळ नाही. पण अजूनही सर्वकाही अनिश्चित दिसत आहे. इतकंच काय तर पाकिस्तानने मंगळवारी होणारी पत्रकार परिषदही रद्द केली होती. यामुळे अनिश्चितता वाढली होती. पण पाकिस्तानने आयसीसी क्रिकेट अकादमीत जोरदार सराव केला होता. त्यामुळे पुढे काय होतं याची उत्सुकता वाढली आहे.
आयसीसीने पीसीबीच्या तक्रारीचं काहीच केलं नाही, त्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पीसीबीने आयसीसीला दुसरं पत्र लिहिलं आहे. त्यांनी पायक्रॉफ्ट यांना सामनाधिकारी म्हणून सामन्यात ठेवू नये अशी मागणी केली आहे. आता त्यावर काय उत्तर येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ऐन मोक्याच्या क्षणी पायक्रॉफ्ट यांना हटवणार की तेच असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, पाकिस्तानने हा सामना खेळला नाही तर युएईला सुपर 4 चं तिकीट मिळणार आहे.