अफगाणिस्तानमध्ये ऑगस्ट 2021 पासून तालिबानचे सरकार आहे. तालिबान सत्तेत आल्यापासून नागरिकांवर वेगवेगळे निर्बंध घालण्यात आलेले आहेत. येथे स्त्रियांवर अनेक बंधने आहेत. त्यामुळे तालिबानवर जगातील अनेक देशांकडून टीका केली जाते. अशातच आता तालिबानने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्याचा परिणाम हजारो नागरिकांवर होणार आहे. हा निर्णय नेमका काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, तालिबान सरकारने उत्तर अफगाणिस्तानातील बल्ख प्रांतात फायबर-ऑप्टिक इंटरनेट म्हणजेच वायफायवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता नागरिकांवा वायफाय वापरता येणार नाही. अनेक लोकांच्या घरांमध्ये असलेले वायफाय, व्यवसायाच्या ठिकाणी आणि सरकारी कार्यालयांमधील वायफाय सेवा बंद करण्यात आली आहे. अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतल्यापासून तालिबानने लादलेली ही पहिलीच मोठी इंटरनेट बंदी आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे मोबाईल इंटरनेट चालू आहे. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. तालिबानचे सर्वोच्च नेते हिब्तुल्ला अखुंदजादा यांनी वायफाय बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर सर्व केबल कनेक्शन तोडण्यात आले आहेत. वायफाय हे अफगाणिस्तानमधील मुलींसाठी हे असे साधन होते ज्याद्वारे त्या जगाशी संपर्क साधू शकत होत्या आणि शिक्षण घेऊ शकत होत्या, मात्र आता सरकारच्या या निर्णयामुळे त्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
तालिबान सरकारने वायफाय बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला यावर भाष्य केले आहे. प्रांतीय प्रवक्ते हाजी अताउल्लाह झैद यांनी सांगितले की, ‘अनैतिक कृत्ये रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र इंटरनेटची गरज पूर्ण करण्यासाठी देशात एक पर्यायी व्यवस्था निर्माण केली जाईल.’ सध्या फक्त बल्ख प्रांतात ही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता आगामी काळात ही बंदी संपूर्ण देशात घातली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान याआधी तालिबानने दहशतवाद्यांना बॉम्बस्फोट करण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षेचा हवाला देत धार्मिक उत्सवांच्या काळात मोबाइल नेटवर्क बंद केले होते. मात्र आता तालिबानने थेड ब्रॉडबँडवर बंदी घातली आहे. आगामी काळात ही बंदी संपूर्ण देशात घातली जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.