Palghar News: शेती हिरवाईने बहरली! समाधानकारक पावसामुळे बळीराजाला चांगले दिवस
esakal September 17, 2025 11:45 PM

वाणगाव : मागील काही दिवसांत पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ढगाळ वातावरण तर कधी ऊन अशा बदलत्या वातावरणामुळे भातशेतीवर करपा, कडा करपा, बगळ्या रोग आणि काही प्रमाणात रोग व किडींचा प्रादुर्भाव जाणवत होता. सध्या पालघर जिल्ह्यात गारवा, पाऊस सरींच्या स्वरूपात बरसत असल्याने भातपिकाला चांगले फुटवे आले आहेत. जिल्ह्यातील हळवी भातपिके फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत.

जिल्ह्यातील गरवे आणि निमगरवे भातशेती पोटरीत आली असून लोंब्या तयार होताना दिसत आहेत. गेल्या हंगामापेक्षा यंदा पालघरजिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात भातलागवड झाली आहे. त्यामुळे समाधानकारक परिस्थिती राहिल्यास पुढील एका महिन्यात भात कापणीस तयार होईल, असे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले.

मनगटावर बांधलेले स्मार्टवॉच हृदयाचे ठोके कसे ओळखते? भात खाचरात खतांचे नियोजन

भात शेतीसाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश अशी खतांची शिफारस करण्यात आलेली आहे. भाताच्या रोपांची लावणी करून साधारणतः ५५ ते ६० दिवस झाले आहेत. हळव्या जाती, गरव्या, निमगरव्या वाणांची लागवड करण्यात आली आहे. भातशेतीच्या शेवटच्या टप्प्यात निमगरव्या व गरव्या जातींमध्ये लावणीनंतर २० टक्के नत्र आणि संकरित जातींकरिता उर्वरित २५ टक्के लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.

भात खाचरात पाण्याची पातळी पाच ते दहा सेमीपर्यंत ठेवावी. बांध तनमुक्त ठेवावे, जेणेकरून किडीची खाद्य वनस्पती नष्ट होऊन भातपिकावर किडीचा प्रादुर्भाव कमी होईल.

- डॉ. भरत कुशारे, ॲग्रोनॉमिस्ट, शास्त्रज्ञ

स्मार्टफोनचे चार्जर नेहमी पांढऱ्या रंगाचे का असतात?

पालघर जिल्ह्यात गारवा, पाऊस सरींच्या स्वरूपात बरसत असल्याने सध्या हळवे भात चांगलेच तयार होत आहे. दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. दाणे भरण्याच्या कालावधीत पावसाने साथ दिल्यास यंदा चांगले उत्पादन येऊ शकते.

- संजय पाटील, भात उत्पादक , उर्से

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.