MLA Raju Navghare : हिंगोलीत ओला दुष्काळ जाहीर करा; आमदार राजु नवघरे यांनी घेतली अजित पवार यांची भेट
esakal September 17, 2025 11:45 PM

हिंगोली - हिंगोली जिल्ह्यात सातत्याने अतिवृष्टी होत आहे. जिवीत आणि वित्त हानी मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ दुष्काळ जाहीर करुन अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्या अशी मागणी राजु नवघरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवार (ता. १६) मुंबईत भेट घेऊन केली आहे.

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून सतत अतिवृष्टी होत आहे. ता. १० ते १५ सप्टेंबरपर्यंत तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे. अनेक महसूल मंडळांत एकाच दिवशी मुसळधार पावसाची नोंद झाली, अनेक ठिकाणी तर तीन तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे, यातून पिकांच्या नुकसानीची भीषणता स्पष्ट होते.

आजही अनेक गावे पाण्याखाली गेलेली आहेत, झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटीच्या पावसामुळे मूग, उडीद, कापूस सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सप्टेंबर अनेक ठिकाणी पिके, जमीन वाहून गेली. जोन लाखावर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. वसमत विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

यामध्ये हळद, कापूस, सोयाबीन, पपई तसेच केळी पिकांचे सर्व नुकसान झाले असुन गायी, मेंढ्या यांची जीवितहानी झाली आहे. गुंडा, ता. वसमत येथे दोन महिला यामध्ये वाहून जाऊन मृत्यूमुखी पडल्या आहेत.अशी माहीती आमदार नवघरे यांनी श्री. पवार यांना दिली.

शेतकरी हा आपला अन्नदाता असून त्यांच्या दुःखाच्या काळात शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा हीच अपेक्षा यावेळी व्यक्त केली.त्यामुळे तातडीने मदत झाली पाहीजे, अशी मागणी यावेळी नवघरे यांनी केली आहे. त्यावर अजितदादांनी देखील निवेदनास सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.