खोटी कागदपत्रे देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
esakal September 18, 2025 03:45 AM

खोटी कागदपत्रे देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : ठाणे येथील रहिवासी प्रमाणपत्र मिळवण्याकरिता आपले सरकार या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करून शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याचे माहिती असताना, ते जोडणाऱ्या काशी येथील शान मोहम्मद या तरुणाविरोधात शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शान याने १५ सप्टेंबर २०२५ रोजी ठाण्यातील महापालिका पार्किंग प्लाझा येथील ठाणे तहसीलदार कार्यालयात रहिवासी प्रमाणपत्र मिळवण्याकरिता आपले सरकार या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केला होता. त्या वेळी त्याने आधार कार्ड, वीजबिल, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र ही कागदपत्रे जोडली होती. अर्ज पडताळणीदरम्यान मनोज चौधरी यांनी अर्जदाराने अर्जासोबत जोडलेल्या वास्तव्याच्या पुराव्यामधील शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म प्रमाणपत्र यामध्ये संशयास्पद माहिती नमूद केल्याचे दिसून आले. जन्म प्रमाणपत्र यामध्ये एकाच भाषेत लिहिणे आवश्यक असताना अर्जदाराच्या जन्म प्रमाणपत्रात बाळाचे नाव इंग्रजी भाषेत आणि उर्वरित माहिती मराठी भाषेत दिलेली आहे.
ही बाब निदर्शनास आल्यावर चौधरी यांनी निवासी नायब तहसीलदार दिनेश दैठणकर यांच्या लक्षात आणून दिली. प्रमाणपत्रांची शहानिशा करण्यासाठी अर्जदार शान याला कार्यालयात बोलावून शाळा सोडल्याचा दाखला व जन्म प्रमाणपत्र दाखवण्यास सांगितले असता, त्याच्याकडे ती कागदपत्रे उपलब्ध नव्हती. तसेच अर्जदाराचा अर्ज आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन दाखल करणाऱ्या राकेश नामक तरुणाला विचारणा केली असता, त्याने अर्जदाराने सर्व कागदपत्रे कुठून उपलब्ध केली, याबाबत काही एक माहिती नसल्याचे सांगितले. यावरून अर्जदाराने रहिवासी प्रमाणपत्र मिळावे म्हणून बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आली असून, पुढील तपास वर्तकनगर पोलिस करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.