92169
निरामय विकास केंद्रातर्फे
विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
सावंतवाडी ः होतकरू व गरजू ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणाऱ्या निरामय विकास केंद्राने या शैक्षणिक वर्षातही आपला उपक्रम सुरू ठेवला आहे. संस्थेतर्फे ७२ हुशार विद्यार्थ्यांना एकूण ४ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली. ज्यांना अकरावी, आयटीआय किंवा त्यानंतरच्या शिक्षणासाठी प्रवेश शुल्क भरणे शक्य नाही, अशा गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही मदत महत्त्वपूर्ण ठरली आहे. अकरावीनंतर विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच आयटीआय व इतर अभ्यासक्रमांना शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांपर्यंत मदत देण्यात आली. यावर्षी संस्थेने केवळ विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित न राहता १० शाळांनाही मदत केली आहे. प्रत्येक शाळेला शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात आले. यासोबतच निरामय विकास केंद्र आरोग्य सेवा क्षेत्रातही कार्यरत आहे. ज्या रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य घेणे शक्य नाही, त्यांना संस्थेतर्फे विनामूल्य बेड आणि व्हीलचेअर परत करण्याच्या अटीवर उपलब्ध करून दिल्या जातात. केंद्राचे हे कार्य ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी आणि रुग्णांसाठी एक मोठा आधार ठरला आहे.
--------
92168
चौकुळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दप्तरे
सावंतवाडी ः श्री देवी सातेरी भावई शिक्षण संस्था चौकुळच्या माध्यमातून आज चौकुळ इंग्लिश स्कूलच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना दप्तरांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे, माजी सरपंच आणि संस्थेचे सचिव विजय गावडे, सुरेश शेटवे यांच्याबरोबरच संस्थेचे संस्थापक सदस्य गुणाजी गावडे, नीळू गावडे, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता. याप्रसंगी गुणाजी गावडे व उल्हास पनवेलकर यांच्याकडून सर्व मुलांना चहा- बिस्किटे दिली.