Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात
esakal September 18, 2025 03:45 AM

9 Days of Navratri Can Support Your Mind and Help You Handle Stress: दरवर्षी दोन नवरात्री साजऱ्या होतात. पहिली नवरात्र चैत्र महिन्यात म्हणजे मार्च-एप्रिलमध्ये साजरी होते, जिला चैत्र नवरात्र म्हणतात. तर दुसरी नवरात्र अश्विन महिन्यात म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये साजरी होते, जी शरद नवरात्र म्हणून ओळखली जाते.

मात्र वर्षभरात एकूण चार नवरात्र येतात, त्यापैकी दोन गुप्त नवरात्र असतात. त्यांना माघ गुप्त नवरात्र आणि आषाढ गुप्त नवरात्र असे म्हणतात. परंतु शरद नवरात्र ही मुख्यत्वेकरून आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतात साजरी केली जाते.

हा उत्सव नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा करून साजरा केला जातो. मात्र, नवरात्र हा उत्सव केवळ यासाठीच महत्त्वाचा नाही, तर या काळात केले जाणारे उपवास आणि मंगलमय वातावरण हे एक प्रकारचे अध्यात्मिक आणि शारीरिक शुद्धीकरण आहे. या निमित्ताने नवरात्रीत केली जाणारी पूजा आणि साधना आपल्याला मानसिक शांती मिळवण्यासाठी कशी उपयुक्त ठरू शकते ते पाहूया.

Navratri 2025: आपण नवरात्र का साजरी करतो? हे आहे आध्यात्मिक महत्त्व आणि कारण शिस्तबद्धतेमुळे मानसिक गोंधळ कमी होण्यास मदत होते

अनेकदा ओव्हरीथिंकींग किंवा सतत विचार चालू असणे हे अस्थिर जीवनशैली आणि मनातील अस्थिरतेमुळे होते. जेव्हा आपण काहीच करत नाही, तेव्हा आपले मन विविध कल्पनांमध्ये भटकत राहते. नवरात्रीत दररोज ठराविक वेळेत पूजा करणे, नियम पाळून उपवास करणे, ठराविक वेळेला प्रार्थना करणे यामुळे मनाला शिस्त लागते. वैज्ञानिक संशोधनानुसार अशा दैनंदिन सवयी मनाला लक्ष केंद्रित करण्यास मदत करतात. अनावश्यक विचार डोक्यातून काढून टाकण्यास मदत होते. त्यामुळे दैनंदिन आयुष्याला शिस्त लावणे महत्त्वाचे आहे. यामुळे मन शांत आणि स्थिर राहते.

उपवास शरीर आणि मनासाठी डिटॉक्स व रीसेट

नवरात्रीत उपवास करणे ही एक परंपरा आहे. अनेकजण या परंपरेचे पालन करतात आणि नवरात्रीच्या काळात उपवास करतात. यामुळे केवळ धार्मिक पुण्य मिळत नाही, तर मन आणि शरीर शांत राहते. उपवासामुळे ताणाशी संबंधित हॉर्मोन कॉर्टिसॉलचे प्रमाण कमी होते. उपवासामुळे शरीराचे चक्र सुरळीत होते आणि पचन सुधारते, ज्यामुळे पित्त, पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि इतर पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळे शरीर शुद्ध होते आणि परिणामी मनही शुद्ध होते, ज्यामुळे डोक्यात स्पष्ट विचार येऊ लागतात. उपवासासाठी कमी आणि हलके खाल्ल्याने शरीरही हलके वाटते.

देवीच्या नऊ रूपांचा मानसिक आधार

नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि तिच्या विविध गुणांचे स्मरण केले जाते. यामुळे आपल्याला मानसिक आधार मिळतो. शैलपुत्री स्थैर्य प्रदान करते, ब्रह्मचारिणी शिस्त शिकवते, चंद्रघंटा संतुलन वाढवते, कूष्मांडा ऊर्जा देते, स्कंदमाता करुणा देते, कात्यायनी धैर्य देते, कालरात्र भयावर विजय मिळवायला शिकवते, महागौरी शुद्धता देते आणि सिद्धिदात्री पूर्णत्वाची भावना देते. रोज एका देवीचे स्मरण केल्याने मन केंद्रित होण्यास मदत होते, ज्यामुळे आपण आपले ध्येय उत्तमरीत्या साध्य करू शकतो.

Pitru Paksha 2025: पितरांची मृत्यू तिथी माहिती नाही? 'या' अमावास्येला करा श्राद्ध, मिळतील पूर्वजांचे आशीर्वाद संगीत आणि मंत्र कंपनं निर्माण करते

नवरात्रीच्या काळात स्त्रीसूक्त, देवीची आरती, देवीची विविध स्तोत्रे किंवा गरबा-दांडियाची गाणी हे नऊ दिवस मोठ्या उत्साहाने चालतात. आपण अनेकदा यांचे उच्चारण करतो, परंतु नवरात्रीत म्हटले जाणारे मंत्र, श्लोक, आरती आणि गरबाची गाणी यांचा ताल आणि सूर मानसिक परिणाम करतात. "ऐगिरी नंदिनी...", "या देवी सर्वभूतेषु...", "सर्वमंगल मांगल्ये..." यांचे उच्चारण विशेष ध्वनी स्पंदने निर्माण करतात, जी आपल्या मज्जासंस्थेला शांत ठेवतात. तसेच गरबा आणि दांडिया खेळताना सर्वजण मिळून गाणे आणि नाचणे, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी एकमेकांना मानसिक आधार देते. अशा प्रकारे आवाज आणि लोकांची साथ मिळाल्याने अति विचार करणे कमी होते आणि मन शांत राहते.

गोंधळावर स्पष्टतेचा विजय

नवरात्रीचा अंतिम दिवस म्हणजे विजयादशमी, ज्याला दसरा असेही म्हणतात. हा दिवस अज्ञान आणि भीतीवर ज्ञान आणि धैर्याने मिळवलेल्या विजयाचा संदेश देतो. जसा देवीने राक्षसावर विजय मिळवला, तसाच आपणही नकारात्मक विचार आणि भीतीवर मात करू शकतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.