पुणे, ता. १७ : कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या कलेला उत्तेजन मिळावे यासाठी विद्या महामंडळ संस्थेच्या ‘मूक-बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्रा’तर्फे कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा शुक्रवारी (ता. १९) दुपारी १२ वाजता घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे होणार आहे, अशी माहिती डॉ. अ. ल. देशमुख यांनी बुधवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी मंडळाचे कार्यवाह लीलाधर गाजरे, मूकबधिर विभागाचे महेंद्र आर्वीकर आणि अश्विनी जोशी उपस्थित होते. या स्पर्धेत आठ कर्णबधिर शाळांचा सहभाग असून, १०५ कर्णबधिर विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत. स्पर्धा दुपारी बारा ते साडेतीन या वेळेत होणार असून, त्यानंतर लगेचच बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या स्पर्धेचे परीक्षक उषा उंडे, विनिता पिंपळखरे आणि सुधांशू पानसे असणार आहेत. स्पर्धेतील स्मृतीचिन्ह व रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येणार आहे.