'लाल किल्ल्यावर निजामाचा झेंडा फडकवू' म्हणणाऱ्या रझाकार कासिम रिझवीचं पुढे काय झालं?
BBC Marathi September 18, 2025 09:45 AM
liberationhyderabad कासिम रिझवी

निजाम राजवटीच्या अखेरच्या काळात दोन नावं खूप चर्चेत होती. एक होतं सातवा निजाम मीर उस्मान अली खान आणि दुसरं नाव होतं रझाकार नेता कासिम रिझवीचं.

सामान्य वकील म्हणून कारकीर्दीची सुरुवात केलेल्या रिझवीने भारतीय संघराज्यात संस्थानांच्या विलिनीकरणादरम्यान 'रझाकार' नेता म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याने वकिलीचा काळा कोट सोडून लष्करी जनरलचा पोशाष घालणं सुरू केलं होतं.

कासिम रिझवीच्या कार्याचा त्याच्या समकालीन नेते आणि इतिहासकारांनी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून अभ्यास केला आहे. पण सर्वांच्या लेखनात एकमत आहे की, त्याची प्रक्षोभक भाषणं आणि कारवाया हिंसाचाराला चालना देऊन, अनेक लोकांचा जीव आणि मालमत्ता नष्ट होण्यास कारणीभूत ठरल्या आणि हैदराबाद संस्थान कोसळण्याच्या उंबरठ्यावर आणून सोडलं.

"जर हैदराबादवर सैन्याची कारवाई झाली, तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर निजामांचा झेंडा (असफ जाहिस) फडकवू. बंगालच्या समुद्राच्या पाण्याने निजामांच्या पायांना अभिषेक करू," अशा प्रकारची भाषणं कासिम रिझवी करत असत, असं इतिहासकारांनी लिहिलं आहे.

कासिम रिझवी : एक वादग्रस्त व्यक्ती

भारतीय संघराज्याच्या राज्य व्यवहार विभागाचे तत्कालीन सचिव व्ही.पी. मेनन यांनी त्यांचं पुस्तक 'द स्टोरी ऑफ द इंटिग्रेशन ऑफ द इंडियन स्टेट्स' यात लिहिलं आहे की, "दख्खन (डेक्कन) प्रदेशाच्या इतिहासात कासिम रिझवी हा एक वादग्रस्त व्यक्ती होता."

liberationhyderabad

हैदराबाद स्टेट काँग्रेसचे माजी अध्यक्ष रामानंद तीर्थ यांनी त्यांचं पुस्तक 'हैदराबाद फ्रीडम स्ट्रगल : एक्सपिरियन्सेस-मेमरीज' (पृष्ठ 261) या पुस्तकात म्हटलं आहे की, "रिझवी निजामाच्या हातातील फक्त एक बाहुला होता. निजाम सांगेल तसं तो करायचा. निजामानं स्वतःच रझाकाराच्या नावाने खासगी सैन्य स्थापन करण्यास प्रोत्साहन दिलं."

स्वतंत्र हैदराबाद संस्थानाची कहाणी

भारत सरकारच्या स्वातंत्र्य कायद्यानुसार, 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवट संपल्यानंतर निजामांनी हैदराबाद संस्थान भारत किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होणार नाही आणि त्यांच स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्व कायम राहील असं जाहीर केलं.

निजामच्या राज्याला स्वतःचं लष्कर, वाहतूक, रेल्वे, विमानसेवा, टपाल सेवा, चलन आणि टेलिग्राफ सेवा होती.

liberationhyderabad हैदराबाद स्टेट आर्मी

भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्यभागी असल्यामुळे आणि संरक्षणाच्या कारणास्तव, भारतीय संघराज्याला निजामचं राज्य विलीन होणं गरजेचं वाटलं. चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी एक वर्षापर्यंत 'जैसे थे' स्थिती कायम ठेवण्याचा दोन्ही बाजूंनी करार झाला.

रिझवीची मुलेही रझाकार

हैदराबाद राज्यातील मुसलमानांमध्ये ऐक्य साधण्यासाठी एमआयएम (मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) स्थापन केलं गेलं. याला 'इत्तेहाद' असंही म्हटलं जात.

निजामाच्या राज्यातील लातूरमध्ये (सध्या महाराष्ट्रात) वकील म्हणून काम करणारे कासिम रिझवी, 'जैसे थे' करारापूर्वीच एमआयएमचे (इत्तेहाद) अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि ते हैदराबादला गेले.

या संघटनेत रझाकार हा एक विभाग होता. 'रझाकार' म्हणजे स्वयंसेवक. इतिहासकार लिहितात की, रझाकारांच्या मदतीने रिझवीने हिंसक कृत्यं केली.

liberationhyderabad हैदराबादचे खासगी रझाकार सैन्य

निजामाच्य राज्याचे शेवटचे पंतप्रधान मीर लाइक अली यांनी त्यांचं पुस्तक 'द ट्रॅजेडी ऑफ हैदराबाद' मध्ये लिहिलं की, रिझवीने आपल्या दोन मुलांचा रझाकारांच्या बटालियनमध्ये समावेश केला. (हैदराबाद ट्रॅजेडी- पृष्ठ-289)

मीर लाइक अली यांनी लिहिलं की, "रझाकारांमध्ये कोणतीही जात किंवा धर्म महत्त्वाचा नव्हता. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सगळे यात सामील झाले. पण मुस्लीम बहुसंख्येमुळे रझाकार म्हणजे मुस्लीम असा समज प्रस्थापित झाला."

रिझवीचा 'निजामावर' प्रभाव होता का?

काहींच्या मते, अल्पावधीतच कासिम रिझवीने निजाम आणि त्याच्या सरकारवर आपला प्रभाव पाडला.

व्ही.पी. मेनन यांनी त्यांच्या लिखाणात म्हटलं आहे की, मीर लाइक अलींच्या पंतप्रधानपदाच्या नियुक्तीतही रिझवीची भूमिका होती, ज्यामुळे निजाम सरकार रिझवीच्या नियंत्रणाखाली आले.

Getty Images शेवटचे निजाम

व्ही. पी. मेनन यांनी लिहिलं आहे की, रिझवीला ठामपणे वाटत असे की, हैदराबादच्या भविष्याचा निर्णय तोच करेल. त्याला विश्वास होता की, हैदराबाद कधीही आपलं स्वातंत्र्य सोडणार नाही आणि विलीन होण्याचा किंवा जनमताचा आग्रह झाला तर तलवार हाच शेवटचा उपाय असेल. त्याच्या बेजबाबदार वर्तनामुळे निजामसुद्धा संकटात येतील," असं मी त्याला सांगितलं होतं. ('द स्टोरी ऑफ द इंटिग्रेशन ऑफ द इंडियन स्टेट्स-व्ही.पी. मेनन-पृष्ठ 318)

रामानंद तीर्थ यांच्यासारख्या त्या काळातील निजाम स्टेट काँग्रेस नेत्यांनी सामान्य लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये सरकारच्या यंत्रणेकडून रझाकारांना मदत मिळाली असल्याचा आरोप केला.

कासिम रिझवीला रझाकार व्यवस्था संपवायची होती?

निजाम सरकारमध्ये काम करणाऱ्या त्या काळातील काही अधिकाऱ्यांच्या मते, रझाकारांच्या कृतीमुळे निजामाचे भारताशी असलेले संबंध ताणले गेले होते.

'ऑपरेशन पोलो' दरम्यान निजामचे सिव्हिल सर्व्हिस अधिकारी मोहम्मद हैदर हे उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत होते. त्यानंतर त्यांना भारत सरकारच्या चौकशीला सामोरं जावं लागलं. त्या अनुभवांची त्यांनी डायरीत नोंद केली आणि ती 'ऑक्टोबर कूप: ए मेमोयर ऑफ द स्ट्रगल फॉर हैदराबाद' (तेलुगू भाषांतर: 1948 - 'हैदराबाद पठानम') या पुस्तकात प्रकाशित झाली.

liberationhyderabad रझाकार गावोगावी परेड काढत असत.

"रझाकारांना सरकारी सुरक्षा विभागाने कुठलीही मदत किंवा पाठिंबा दिला नाही. त्याला अवाजवी महत्त्व दिलं गेलं. त्याच्या बेजबाबदार भाषणांमुळे आमचं काम खूप कठीण झालं. इच्छित उद्धिष्ट साध्य झाल्यास रझाकार संस्था संपुष्टात आणायची यासाठी रिझवी तयार असल्याचं दिसून आलं." (पृष्ठ 68, 79)

"त्याच्या धार्मिक उन्मादामुळे त्यानं आपली योजना राबवण्यासाठी तयारी केली. काही हिंसक घटना झाल्यामुळे रझाकारांबद्दल संताप आणि भीती निर्माण झाली. रझाकारांसारखी निमलष्करी संस्था भविष्यात कोणते दुष्परिणाम घडवू शकते, याची त्याला जाणीव होती. परिस्थिती योग्य ठिकाणी आली की, ती संस्था रद्द करायची अशी त्याची योजना होती," असं मीर लाइक अली यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे.

liberationhyderabad

13 ते 17 सप्टेंबर 1948 दरम्यान झालेल्या 'ऑपरेशन पोलो' च्या कारवाईत हैदराबाद भारताचा भाग बनला.

बीबी नगर दरोडा, पत्रकार शोएबुल्लाह खान हत्या प्रकरणासह एकूण तीन आरोप कासिम रिझवीवर लावण्यात आले. चौकशीसाठी एक विशेष न्यायाधिकरण (ट्रायब्यूनल) स्थापन करण्यात आले.

वकील असलेल्या कासिम रिझवीने न्यायाधिकरणासमोर स्वतःच आपली बाजू मांडली.

10 सप्टेंबर 1950 रोजी न्यायाधिकरणाने निकाल दिला. बीबी नगर दरोडा प्रकरणात रिझवीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली, तर पत्रकार शोएबुल्लाह हत्या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. उच्च न्यायालयात अपील केल्यावर जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्यात आली.

चौकशीसाठी (प्री-ट्रायल डिटेंशन) दोन वर्षे आणि शिक्षा सात वर्षे असा एकूण नऊ वर्षांचा काळ रिझवीने चंचलगुडा आणि येरवडा कारागृहात घालवला.

रिझवीची 11 सप्टेंबर 1957 रोजी सुटका झाल्याचे इतिहासकार नरेंद्र लुथर यांनी लिहिलं आहे.

येरवडा कारागृहातून थेट हैदराबादला येऊन रिझवीने 'इत्तेहाद'ची सूत्रं अब्दुल वाहिद ओवैसी यांच्याकडे दिली. पत्रकार परिषदेत त्यानं सांगितलं की, जुना गुन्हेगार (दोषी) असल्यामुळे तो वकिली करू शकत नाही आणि जीवन जगणं कठीण आहे, म्हणून तो पाकिस्तानला जात आहे. (हैदराबाद चरित्र- नरेंद्र लूथर. पृष्ठ- 358)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

  • हैदराबादचं नाव भाग्यनगर होतं? भाग्यलक्ष्मी मंदिराचा खरा इतिहास काय आहे?
  • हैदराबादचे निजाम पोर्तुगीजांकडून गोवा का विकत घेणार होते?
  • भारतात 'पाकिस्तान' बनवण्याचा डाव असा उधळला गेला होता
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.