वकिलांनी लिहिले खुले पत्र
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
खजुराहो येथील भगवान विष्णूच्या मूर्तीवरून सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी केलेल्या टिप्पणीवरुन प्रतिक्रिया उमटत आहेत. वकील विनीत जिंदल यांच्यानंतर आता वकील सत्यम सिंह राजपूत यांनी खजुराहो येथील भगवान विष्णूच्या मूर्तीवर सरन्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणीचा विरोध करत त्यांना खुले पत्र लिहिले आहे. सरन्यायाधीशांनी या टिप्पणींवर पुनर्विचार करत त्या परत घ्याव्यात आणि सर्व धार्मिक समुदायांचा विश्वास बहाल करण्यासाठी योग्य स्पष्टीकरण जारी करावे अशी विनंती सत्यम सिंह यांनी केली आहे.
भगवान विष्णूचा समर्पित भक्त म्हणून मी वैयक्तिक स्वरुपात या टिप्पणींमुळे स्तब्ध आहे. लाखो हिंदूंची भगवान विष्णूबद्दलची श्रद्धा आणि भक्ती केवळ वैयक्तिक विश्वासाचा विषय नाही, तर त्यांच्या आध्यात्मिक अस्तित्व आणि सांस्कृतिक ओळखीचा आधार असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
धर्माची प्रतिष्ठा कायम राखा
सनातन धर्माचा अनुयायी म्हणून सरन्यायाधीशांना हे पत्र लिहिले आहे. भगवान विष्णू आणि सनातनी आस्थेच्या विरोधात केलेली टिप्पणी सरन्यायाधीशांनी त्वरित मागे घ्यावी अशी मागणी केली आहे. या पत्राची एक पत्र राष्ट्रपतींना पाठविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती याप्रकरणाला गांभीर्याने घेतील आणि भारतात प्रत्येक धर्माची प्रतिष्ठा कायम राखतील अशी आशा असल्याचे विनीत जिंदल यांनी स्वत:च्या पत्रात म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
खजुराहोच्या प्रसिद्ध जावरी मंदिरातील भगवान विष्णूची खंडित मूर्तीची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचा आदेश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सरन्यायाधीश गवई आणि न्यायाधीश ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने नकार दिला होता. तसेच हा विषय न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात नव्हेतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अधीन येत असल्याचे स्पष्ट केले होते. यादरम्यान सरन्यायाधीशांनी तुम्ही भगवान विष्णूचे भक्त असल्याचे सांगता, मग आता त्यांनाच प्रार्थना करा अशी टिप्पणी याचिकाकर्त्यांना उद्देशून केली होती.