92210
महामार्गावरील अपूर्ण कामांचा वाचला पाडा
खारेपाटणवासीय आक्रमक; सहाय्यक अभियंता वृषाली पाटील यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १७ ः मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण परिसरातील विविध अपूर्ण कामांमुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रीमती वृषाली पाटील यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. समस्या मार्गी न लागल्यास तीव्र छेडण्यात येईल, असा ईशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या विविध अपूर्ण कामाच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी खारेपाटण ग्रामस्थानी नुकतेच येथील उपविभाग कार्यालयासमोर मोर्चा नेत आंदोलन केले होते. मात्र, त्यावेळी अधिकारी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थ नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या खारेपाटण उपविभाग कार्यालयाच्या श्रीमती पाटील या कनिष्ठ अभियंता बी. जी. कुमावत यांच्यासह खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालयात आल्या होत्या. यावेळी खारेपाटण सरपंच सौ. प्राची ईसवलकर यांनी लेखी निवेदन देत खारेपाटण येथील महामार्गाशी संलग्न कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी माजी सरपंच व भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमाकांत राऊत, ठाकरे शिवसेनेचे कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर, शिवसेनेचे कणकवली तालुकाप्रमुख मंगेश गुरव, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, माजी सरपंच किशोर माळवदे, ग्रामपंचायत सदस्य जयदीप देसाई, सुधाकर ढेकणे, सौ. मनाली होणाळे, असली पवार, श्री. उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी खारेपाटण गावात राष्ट्रीय महामार्ग गेला असून येथील कामकाज समाधानकारक झाले नसल्याचे सांगून श्री. कुमावत यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. दरम्यान, खारेपाटण येथील महामार्गाशी संबधित विविध अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन श्रीमती पाटील यांनी ग्रामस्थानी दिले. समस्यांचे निवारण तातडीने न केल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी सरपंच राऊत यांनी दिला.
----------------
अशा आहेत मागण्या
खारेपाटण कार्यालयासाठी कायमस्वरूपी सहायक अभियंत्यांची नेमणूक करणे, खारेपाटण येथे ब्रिजच्या दोन्ही बाजूला तसेच रामेश्वरनगर स्टॉप येथे रंब्लर्स लावण्यात यावेत, खारेपाटण बॉक्सवेल पुलावर बंद असलेले पथदीप सुरु करणे, बॉक्सवेल अंडर पासमध्ये लाइट लावणे व सुरक्षेचा कारणास्तव आरसे बसविणे, महामार्गाच्या दोन्ही बाजूला अपूर्ण असलेला सर्विस रोड तातडीने बनविणे, साईड गटारे व रस्त्यावरील पाण्याचा निचरा करणे, महामार्गावर आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे, महामार्गाचे रस्त्यावरील पाणी गावातील रस्त्यावर येत असल्याने खारेपाटण हायस्कूल जवळ रस्ता खराब झाला आहे, ते तातडीने दुरुस्त करणे आदी मागण्या यावेळी ग्रामस्थानी अधिकाऱ्यांकडे केल्या.