अवजड वाहनांच्या वाहतुकीचा बोजवारा
esakal September 18, 2025 04:45 PM

अवजड वाहनांच्या वाहतुकीचा बोजवारा
दसरा-दिवाळीत व्यापाऱ्यांना बसणार फटका

ठाणे शहर, ता. १७ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यातील शहरे कोंडीमुक्त करण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील मार्गांवर जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीला रोज १८ तासांची बंदी घालण्यात आली आहे. शासन, प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका उरण येथील न्हावा शेवा बंदराला बसणार असून ऐन सण-उत्सवाच्या काळात गुजरात, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांवरदेखील मंदीचे संकट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उरण येथून रोज लाखांच्या संख्येत जड-अवजड वाहनांमधून विविध प्रकारचा देश- विदेशातून येणारा माल ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतून गुजरातला जातो. त्यावर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार असल्याने तेथील व्यापाऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे.

काही दिवसांवर दसरा, दिवाळी सण येऊन ठेपला आहे. देशभरात साजरे मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जाणाऱ्या या सणाच्या निमित्ताने व्यापारीवर्गाकडून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या मालाची मागणी सुरू झाली आहे. या मालाचा पुरवठा उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमधून देशभरात केला जातो. गुजरात, पालघर, वसई, नाशिक येथे जड-अवजड वाहनामधून मालाची वाहतूक होते. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून अनेक मार्ग जात असल्याने ते या मालाच्या वाहतुकीचे महत्त्वाचे मार्ग आहेत; मात्र आता हे मार्ग जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीकरिता बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत असे तब्बल १८ तास ही वाहने रस्त्यावर दिसणार नाहीत. त्यांना रात्री १२ ते सकाळी सहा वाजेपर्यंत अवघा सहा तासांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचा मोठा नकारात्मक परिणाम मालवाहतुकीवर होणार असल्याने यामुळे व्यापारीवर्ग चिंतेत आला आहे.

घोडबंदर मार्गांवरून रोज ५० हजार जड-अवजड वाहने गुजरात, पालघरकडे जातात. तर तेवढ्याच संख्येने गुजरात, सुरतकडून येतात. या वाहनांना सहा तासांचा अवधी इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी पुरेसा होणार नाही. परिणामी, कमी वाहनांची वाहतूक होऊन मालाचा मोठा तुटवडा निर्माण होईल, अशी भीती व्यापाऱ्यांना वाटत आहे.

१८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत असणार बंदी
ठाणे पोलिस आयुक्तालयातील शहरांमधून जाणाऱ्या मार्गावर जड-अवजड वाहनांना रोज १८ तास बंदी असणार आहे.

बंदी असलेले मार्ग
कोपरी वाहतूक उपविभाग - आनंदनगर चेकनाका
कासारवडवली वाहतूक उपविभाग - घोडबंदर मार्ग
कळवा वाहतूक उपविभाग - बेलापूर-ठाणे रोडने विटावा जकातनाका
मुंब्रा वाहतूक उपविभाग - महापे- नवी मुंबईमार्गे शिळफाटा
नारपोली वाहतूक उपविभाग - चिंचोटी नाकामार्गे नारपोली
भिवंडी वाहतूक उपविभाग - नदीनाका
कोनगाव वाहतूक उपविभाग - रांजणोली चौक
कल्याण वाहतूक उपविभाग - नाशिक- मुंबई महामार्ग
विठ्ठलवाडी वाहतूक उपविभाग - तळोजा बायपासमार्गे उसाटणे खोणी, नेवाळी नाका
अंबरनाथ वाहतूक उपविभाग - कर्जतकडून बदलापूरकडे येणारा मार्ग

कोंडी होणारी ठिकाणे
ऐरोली, विटावा रेल्वे क्रॉसिंग, मुकुंद कंपनी सिग्नल, कळवा रुग्णालय कट, विटावा चौक, दिघा गाव, शिळफाटा, बायपास घाट, गायमुख घाट, चिंचोटी नाका, अंजुर रेल्वे ब्रिज, हरिहर सर्कल नाला, भिवंडी उड्डाणपुलाखालील रस्ता, कोनगाव मेन सर्कल, विठ्ठलवाडी-अंबरनाथ येथील मेट्रो पुलाचे पत्रे, सर्व ठिकाणचे मेट्रो कामासाठी वापर होत असलेले हायड्रा आणि क्रेन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.