Doctors Strike : राज्यातील डॉक्टर आज संपावर, आरोग्यसेवा कोमात, कारण काय? कोणावर सर्वाधिक परिणाम? जाणून घ्या
Tv9 Marathi September 18, 2025 08:45 PM

आज संपूर्ण महाराष्ट्रात डॉक्टरांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) या संघटनेच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आला आहे. शासनाच्या एका निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी डॉक्टरांनी हे पाऊल उचलले आहे. हा संप आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाला असून, तो उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत चालणार आहे. या काळात राज्यातील सर्व सरकारी, खाजगी आणि पालिका रुग्णालयांमध्ये आरोग्यसेवा पूर्णपणे ठप्प राहणार आहेत.

महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल (MMC) मध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. शासनाच्या या निर्णयाला आयएमएने तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते, होमिओपॅथी शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना अॅलोपॅथी उपचार पद्धतीचा अभ्यास आणि अनुभव नसतो. त्यामुळे, त्यांना अॅलोपॅथी उपचार करण्याची परवानगी दिल्यास रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे.

हा संप आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाला असून तो उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत चालणार आहे. या २४ तासांच्या काळात संपूर्ण आरोग्य सेवा पूर्ण ठप्प झाली आहे. याचा थेट परिणाम रुग्णांवर होत आहे.

कोणत्या सेवा बंद राहणार?

या संपामुळे राज्यातील सर्व सरकारी, खाजगी आणि पालिका रुग्णालयांमधील खालील आरोग्यसेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. आज रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (OPD) रुग्णालयांमध्ये नवीन रुग्णांची तपासणी होणार नाही. तसेच आधीपासून ठरलेल्या सर्व शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच नवीन रुग्णांची तपासणी आणि उपचार केले जाणार आहे. तसेच आपत्कालीन सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहणार आहेत.

आयएमएच्या डॉक्टरांनी या निर्णयाविरोधात यापूर्वीही सरकारला अनेक निवेदने दिली होती. सरकारने हा निर्णय स्थगित केल्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता ही नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यामुळे डॉक्टरांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जर हा निर्णय मागे घेतला नाही, तर भविष्यात आणखी मोठे आंदोलन करण्यात येईल, असे आयएमएने म्हटले आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.