शाही कुटुंबाचा थाटच निराळा असतो. शाही कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे राहणे, खाणे, फिरणे हे सर्वांनाच आकर्षित करते. त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी देखील इतर लोकांना देखील रस असतो. शाही कुटुंबातील लोक काय खातात? त्यांच्या जेवणात नेमका मेन्यू काय असतो? असे अनेक प्रश्न सामान्य माणसाला पडतात. ब्रिटनचे शाही कुटुंबीय त्यापैकीच एक आहेत. या शाही कुटुंबाच्या खाण्यात लसणाचा वापरण्यावर बंदी घातलण्यात आली आहे. नुकताच जेव्हा ब्रिटनच्या शाही राजघराण्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी शाही भोजन आयोजित केले, तेव्हाही कोणत्याही पदार्थामध्ये लसणाचा वापर केलेला नव्हता. शाही कुटुंब लसूण खाणे नेहमीच टाळते. यामागचे नेमकं कारण काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…
ब्रिटनच्या शाही कुटुंबाचे लसूण न खाण्याचे कारण प्रिन्सेस डायनाच्या शेफ असलेल्या कॅरोलिन रॉब यांनी काही वर्षांपूर्वी उघड केले होते. त्याविषयी फारच कमी लोकांना माहिती होती. जगभरात खाद्य पदार्थ बनवताना लसणाला मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अनेकजण लसणाशिवाय खाद्य पदार्थांचा विचारही करत नाहीत. त्यामुळे आपण जेवण बनवताना जवळपास प्रत्येक पदार्थात लसूण घालतो. इटलीपासून फ्रान्सपर्यंत लसणाशिवाय कोणताही खारट पदार्थ बनतच नाही, पण शाही कुटुंबात लसणावर एकप्रकारे बंदी आहे. चुकूनही त्यांच्या खाण्यात लसूण कधी मिसळला जात नाही. या मागे खास कारणही आहे.
ब्रिटनमधील शाही भोजनात लसणाचा वापर होत नाही
शाही राजघराणे जेव्हा शाही भोजनाचे आयोजन करतात तेव्हाही लसणाच्या वापरावर बंदी घातलेली असते. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प ब्रिटनला गेले, तेव्हा त्यांना बकिंगहॅम पॅलेसमध्ये भोजनासाठी आमंत्रण देण्यात आले होते. तेव्हा देखील त्यांच्या जेवणात लसणाचा वापर करण्यात आला नव्हता. जेव्हा ब्रिटिश शाही कुटुंब परदेशी पाहुण्यांसाठी स्टेट बँक्वेट आयोजित करते, तेव्हा मेन्यू शाही भोजन प्रोटोकॉलनुसार ठरतो. त्यातील कोणत्याही पदार्थामध्ये लसूण घातला जात नाही. क्वीन एलिझाबेथ यांनी जेव्हा गादी स्वीकारली, तेव्हापासून ही परंपरा अधिक काटेकोरपणे पाळली जाऊ लागली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की औपचारिक भोजनात लसूण आणि जास्त मसालेदार पदार्थ नसावेत.
परदेशी पाहुण्यांसाठीही हाच नियम
मग ते डोनाल्ड ट्रम्प असोत, बराक ओबामा, नरेंद्र मोदी किंवा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष शाही भोजनाचा मेन्यू नेहमी या प्रोटोकॉलनुसार ठरतो. शाही भोजनादरम्यान नेते एकमेकांजवळ बसून बोलतात. अशा वेळी लसूण असलेल्या पदार्थांमुळे तोंडाला वास येऊ शकतो. लसणाचा वास हा अस्वस्थता निर्माण करू शकते. 2019 मध्ये जेव्हा ट्रम्प ब्रिटनला गेले होते, तेव्हा क्वीन एलिझाबेथ हयात होत्या. त्यांनी ट्रम्प यांच्यासाठी आयोजित केलेल्या भोजनातही या प्रोटोकॉलचे पालन झाले होते.
ट्रम्प यांच्या भोजनाचा मेन्यू काय होता?
1. स्टार्टर / सलाड – हॅम्पशायर वॉटरक्रेस पन्ना कोट्टा, पार्मेसन शॉर्टब्रेड आणि क्वेल एग सलाडसह
2. मुख्य पदार्थ – ऑर्गेनिक नॉरफॉक चिकन बॉलोटीन, झुचीनीच्या आवरणात, थाइम आणि खारट ज्यूससह
3. मिठाई – केंटिश रास्पबेरी सॉर्बेटसह व्हॅनिला आइस्क्रीम बॉम्बे, आत हलके शिजवलेले व्हिक्टोरिया प्लम्स
4. पेय आणि कॉकटेल – ट्रान्सअटलांटिक व्हिस्की सॉर, जॉनी वॉकर ब्लॅक व्हिस्की, मुरांबा, पेकान फोम आणि टोस्टेड मार्शमॅलो, स्टार आकाराचे बिस्किट.
या पदार्थांमध्ये कुठेही लसणाचा वापर झाला नव्हता. खाणे हलके, सुसंस्कृत आणि शाही परंपरेला साजेसे होते. तसेच पास्ता किंवा कोणतेही सीफूड त्यात नव्हते. शाही भोजन सामान्यतः बकिंगहॅम पॅलेसमध्येच दिले जाते. हे लंडनमधील ब्रिटिश सम्राटांचे अधिकृत निवासस्थान आहे. शाही भोजनासाठी ही सर्वात प्रतिष्ठित जागा मानली जाते. बकिंगहॅम पॅलेसमध्ये बॉलरूम नावाचा एक भव्य हॉल आहे, जिथे सुमारे 150 ते 170 पाहुणे एकत्र बसू शकतात. हाच हॉल स्टेट डिनरसाठी वापरला जातो.
शाही कुटुंब लसूण का खात नाही?
शाही कुटुंब लसूण का खात नाही याचे कारण त्यांचे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणे आहे. या कुटुंबातील कोणताही सदस्य नेहमीच कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात सहभागी होत असतो. तसेच त्यांना अनेक लोकांशी भेटणे आणि माध्यमांना मुलाखती द्याव्या लागतात. अशा वेळी बोलताना त्यांच्या तोंडातून वास येऊ नये म्हणून ते लसूण खात नाहीत. लसूण खाल्ल्याने त्याचा वास तोंडात आणि श्वासात बराच वेळ राहतो. शाही कुटुंबातील सदस्य नेहमीच परदेशी नेते, पाहुणे आणि जनतेला जवळून भेटत असतात. अशा परिस्थितीत तीव्र वास अस्वस्थता निर्माण करू शकतो.
ब्रिटिश शाही खानपान नियमांमध्ये लसूण, कांदा आणि जास्त मसालेदार पदार्थ यांचा वापर जेवण बनवताना केला जात नाहीत. राजमहालातील शेफना स्पष्ट सूचना असतात की औपचारिक भोजनात लसूण घालू नये.
शाही कुटुंब पास्ता आणि सीफूड का खात नाही
ब्रिटिश शाही खानपानात पास्ता आणि सीफूडबाबतही काही कठोर नियम आहेत. हे थेट आरोग्य, सुरक्षितता आणि शिष्टाचाराशी संबंधित आहेत. शाही भोजनात असा पदार्थ दिला जातो, जो सहज आणि शालीनतेने खाता येईल. पास्ता खाताना सॉस पडण्याचा किंवा कपड्यांवर डाग पडण्याचा धोका जास्त असतो. तसेच पास्ता, पिझ्झा यासारखे पदार्थ शाही शिष्टाचारानुसार खूप अनौपचारिक मानले जातात. हे रोजच्या घरी खाण्यासाठी ठीक आहे, पण औपचारिक भोजन किंवा परदेशी नेत्यांच्या स्वागतासाठी नाही.
क्वीन एलिझाबेथ द्वितीय आपल्या भोजनात जड कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खात नाहीत. म्हणजे पास्ता, बटाटे, तांदूळ यांचा त्या तिरस्कार करतात. त्यांना हलके आणि प्रोटीनयुक्त भोजन जास्त आवडायचे.
सीफूड का नाही?
शाही कुटुंब सतत प्रवास करत असते. सीफूडमुळे फूड पॉयझनिंगचा धोका असतो. प्रवासादरम्यान किंग चार्ल्स आणि विल्यम यांसारख्या सदस्यांना सीफूड खाण्यास मनाई आहे. सीफूडमुळे ऍलर्जी होणे सामान्य आहे. जर भोजनात मोठ्या संख्येने लोक असतील, तर शाही कुटुंब हा धोका टाळू इच्छितात. त्यामुळे ते जेवणात सीफूडचा समावेश करुन घेत नाहीत. त्यामुळे शाही कुटुंबातील जेवणात सीफूड, पास्ता या दोन पदार्थांवर बंदी आहे. तसेच कोणताही पदार्थ बनवताना त्यामध्ये लसूण वापरण्यावरही बंदी आहे.
वर्षातून किती वेळा होते शाही भोजन?
ब्रिटनची रॉयल फॅमिली दरवर्षी सरासरी दोन ते तीन वेळा शाही भोजनाचे आयोजन करते. हे आयोजन तेव्हा होते जेव्हा एखादा राष्ट्रप्रमुख ब्रिटनच्या दौऱ्यावर असतो. बहुतांश वेळा ही मेजवानी बकिंगहॅम पॅलेसच्या भव्य बॉलरूम हॉलमध्ये आयोजित केली जाते, जिथे 150 ते 170 पाहुणे एकत्र बसू शकतात. या शाही जेवणासाठी चांदी आणि सोन्याची ताटे, वाट्या, चमचे वापरले जातात. तसेच टेबवलावर सुंदर फुलांचे देखील डेकोरेशन करण्यात येते. हे डेकोरेशन पाहण्यासारखे असते.
शाही मेजवानी कधी होते?
शाही मेजवानी साधारणपणे संध्याकाळी 8 वाजता सुरू होते आणि मध्यरात्रीपर्यंत चालते. याची सुरुवात शाही फॅनफेअर आणि रॉयल टोस्टने होते. त्यानंतर कोर्सनुसार जेवण वाढले जाते. मधूनमधून ऑर्केस्ट्रावर गाणी वाजवली जातात. मुख्य पाहुण्यांच्या आवडीची गाणी खासकरुन वाजवण्याचा कल असतो.