धायरी : धायरी परिसरातील प्रलंबित डीपी रस्त्याच्या कामाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन करून महापालिका प्रशासनाला निवेदन दिले. दीर्घकाळापासून हा रस्ता प्रलंबित असल्याने नागरिक आणि वाहनचालकांना दररोज मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला असून, या रस्त्याशिवाय कोंडी टाळणे कठीण झाले आहे.
विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे आणि महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या पाहणीदरम्यानच नागरिक आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली. “१० हजार कोटींचे बजेट असूनही काम ठप्प का?”, “आयुक्त साहेब, धायरीच्या अस्मितेचा प्रश्न सोडवणार का?” अशा आशयाचे फलक दाखवून मनसे कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
स्थानिक नेते शिवाजी मते, सोनाली पोकळे, विजय मते, बाळासाहेब मंडलिक यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, “सावित्री गार्डन ते सिंहगड रस्ता हा प्रलंबित डीपी रस्ता पूर्ण झाल्यास वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात सुटेल. परंतु संपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना योग्य मोबदला न दिल्याने काम रखडले आहे. तातडीने शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा.”
प्रलंबित रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना, नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांना तसेच व्यावसायिकांना दररोज वेळेवर पोहोचण्यात अडचण येते. अॅम्बुलन्स, अग्निशमन व पोलिसांची वाहनेही वाहतूक कोंडीत अडकतात, यामुळे जीवित धोकाही निर्माण होतो. नागरिकांनी वारंवार आश्वासने मिळूनही काम सुरू न झाल्याने प्रशासनावर अविश्वास व्यक्त केला.
मनसे पदाधिकाऱ्यांनी आयुक्त नवलकिशोर राम यांना लेखी निवेदन देत प्रलंबित काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. अन्यथा रास्ता रोको किंवा महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले. प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन रस्ता सुरू करावा, हीच सर्वांची मागणी होती.