Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?
esakal September 19, 2025 01:45 AM

मुंबई : राज्यभरात गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाचा (Maharashtra Heavy Rain) जोर वाढला आहे. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून त्यामुळे शेतमाल, घरे आणि इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आज ठाणे, रायगड आणि मुंबई परिसरात (Mumbai Rain) हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या (Weather Alert) अंदाजानुसार, 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात आज व उद्या मुसळधार पाऊस होईल. पुढील 48 तास या भागात पावसाचा जोर कायम राहील, त्यानंतर पावसाची तीव्रता हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.

नाशिक, घाटमाथा, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर या भागात पावसाचा जोर कमी होईल.

महत्त्वाची अपडेट! राष्ट्रीय महामार्गावरील पश्चिमेकडील पूल वाहतुकीसाठी बंद होणार? पंचगंगा पुलावर दुहेरी वाहतुकीची चाचणी, पर्यायी मार्ग कोणते?

तसेच जालना आणि परभणी जिल्ह्यांत आज हलका पाऊस होणार असून बीड, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा, अमरावती, अकोला, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल. मात्र, पुढील काही दिवसांत या भागातही पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून कर्नाटकच्या दिशेने दुसरा कमी दाबाचा पट्टा सरकत आहे. याचा संपूर्ण महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम होत आहे. पुढील तीन दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज असून यंदा पाऊस दिवाळीपर्यंत सुरू राहणार की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.