Nashik Monsoon: अवघ्या ३५ मंडळांनी गाठली पावसाची सरासरी; परतीच्या पावसावर जिल्ह्याचे भवितव्य अवलंबून
esakal September 19, 2025 06:45 AM

येवला: पावसाळा संपण्याच्या उंबरठ्यावर असून, आता परतीचा पाऊस शिल्लक आहे. असे असताना या वर्षी जिल्ह्यातील अद्याप ८५ महसूल मंडल सरासरीपासून दूर आहेत. अवघ्या ३५ मंडलांनीच सरासरीचे शतक गाठले आहे. पुढील रब्बी व उन्हाळी हंगामाच्या दृष्टीने पावसाने सरासरी तरी गाठावी ही अपेक्षा लागून आहे. दरम्यान, १५ तालुक्यांपैकी अवघ्या दिंडोरी तालुक्यानेच सरासरी गाठली आहे. उर्वरित सर्वच तालुके ६० ते ८० टक्क्यांत अडकून आहेत.

जिल्ह्यात प्रादेशिक असमतोल असला तरी या वर्षी सर्वत्र समान पाऊस पडला आहे. सुरुवातीपासून कमी-अधिक प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे खरिपाची पिके उत्तम आली असली तरी भविष्याचा विचार करता अजून पावसामध्ये तूट असल्याचे दिसते.

जिल्ह्यातील मालेगाव, येवला, सिन्नर, नांदगाव, चांदवड व देवळा या तालुक्यांवर नेहमीच पाऊस रुसलेला असतो. भौगोलिकदृष्ट्या विभाजन, पर्जन्यछायेचा प्रदेश आणि पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन यासह विविध भौगोलिक कारणांमुळे पावसाचे स्वरूप बदलत असून, जिल्हा दर वर्षीच पर्जन्याच्या बाबतीत पूर्व व पश्चिम भागात विभागला जातो. या वर्षी मात्र सर्वत्रच एकसारखा पाऊस पडलेला दिसतो. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९३४ मिलिमीटर असताना आतापर्यंत केवळ ७०७ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

सरीवर फुगले पावसाचे आकडे

जुलै ते सप्टेंबर अर्थात वार्षिक सरासरीच्या तुलनेत सर्वच तालुक्यांमध्ये ६० ते ८० टक्के पाऊस पडला आहे. याउलट जून, जुलै व ऑगस्टचा विचार केल्यास जिल्ह्यात ७७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पावसाने या वर्षी पिकांना उणीव भासू दिली नसली तरी पुढचे भविष्य अजून परतीवरच अवलंबून आहे. दर वर्षी सप्टेंबरपर्यंत अर्ध्यावर जिल्ह्याची सरासरी पार होते. या वर्षी मात्र एकाच तालुक्याने सरासरी गाठल्याने पुढची चिंता लागून आहे.

आता उरलेले दिवस परतीच्या पावसाचे

पावसात सातत्य असल्याने पिके चांगली आहेत. मात्र आकडेवारी चिंताजनक असल्याने आता पावसाळ्याचे बोटावर मोजण्याइतके उरलेले दिवस आणि ऑक्टोबरमधील परतीचा पाऊस यावरच जिल्ह्याचे भविष्य अवलंबून आहे. गेल्या आठवड्यापासून अधूनमधून पाऊस कोसळत आहे. मात्र मुसळधार नसल्याने जिल्ह्याला सरते वटी जोरदार पावसाची नितांत गरज आहे.

महसूल मंडल तहानलेलीच

या वर्षी पावसाची दमदार सुरुवात झाली असून, जूनमध्ये सरासरीच्या १३३ टक्के इतका दमदार पाऊस झाला. मात्र जुलैत केवळ ६८, तर ऑगस्टमध्ये ६१ टक्के पाऊस पडला. सप्टेंबरमध्ये सरासरीच्या केवळ ६२ टक्केच पाऊस आजपर्यंत पडल्याने मोठी तूट निर्माण झाली आहे. प्रमुख दिवस संपल्यावर केवळ ३५ मंडलांमध्येच आजपर्यंतच्या पावसाची सरासरी ओलांडली आहे. पावसाला दोन महिन्यांची सरासरी ओलांडता आलेली नाही.

Jalna News: बेपत्ता तरुणाची स्कूटी आढळली नदीपात्रात

जिल्ह्यातील सौंदाणे मंडलात फक्त ३६, तर बोरगाव मंडलात ४० टक्के, तर ननाशी मंडलात २२६ टक्के एवढ्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. सुरगाणा, येवला, पेठमध्ये एकाही मंडलाने शंभरी गाठलेली नाही. तसेच सटाणा, कळवण, इगतपुरी, चांदवड येथे केवळ एकच मंडल सरासरी गाठू शकले. याउलट मालेगाव, निफाड तालुक्यात सर्वाधिक मंडलांनी सरासरी गाठली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.