कोथरुड : कोथरुड पोलिस ठाण्यापासून शंभर पावलांच्या अंतरावर असलेल्या मुठेश्वर गणपती जवळ मध्यरात्री झालेल्या गोळीबारात एक इसम जखमी झाला आहे. याप्रकरणात कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोळीबारीची घटना घडली तेथून जवळच कुख्यात गुंड गजानन मारणे याचे घर आहे. गाडीला पुढे जाण्यास साईड न दिल्याच्या कारणातून हा गोळीबार झाल्याचं सांगितलं जात असलं तरी हा गोळीबार कोणाला इशारा होता असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कोथरुड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक संदीप देशमाने म्हणाले की, प्रकाश मधुकर धुमाळ, वय ३६, रा. वाकड हे त्यांच्या मित्रांसमवेत रात्री मुठेश्वर चौकात उभे होते. दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी जायला रस्ता न दिल्याचा वाद घालत केलेल्या गोळीबारात धुमाळ जखमी झाले. ही घटना गँगवारची नाही. गोळीबारात जखमी झालेल्या धुमाळ यांची अशी कोणतीही पार्श्वभूमी आढळलेली नाही.
या घटनेत आरोपी मयूर कुंबरे याने थेट गोळीबार केला. जखमी प्रकाश धुमाळ याला खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कोथरुड पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेमागे आणखी काही पूर्वनियोजित कारण आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
या प्रकरणात मयूर कुंबरे, आनंद चांडलेकर, गणेश राऊत, मोंटी व्यास, रोहित आखाडे आणि दिनेश पाठक आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गोळीबाराची घटना घडली ते ठिकाण कोथरुड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. काल पंतप्रधानांचा वाढदिवस झाला. केंद्रीय राज्यमंत्री व कॅबीनेट मंत्री, राज्यसभा खासदार यांच्याशी संबंधित असलेल्या कोथरुड मध्ये फक्त गाडीला साईट दिली नाही या कारणावरुन गोळीबार होत असेल हे कारण तासनतास वाहतूक कोंडीत अडकणा-या कोथरुडकरांना न पटणारे आहे.