वाकड, ता. १८ : काळाखडक चौकासह रस्त्यांवर आणि पदपथांवर सर्रास बेकायदा पार्किंग होत असून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस विभागाने आता कठोर पावले उचलली आहेत. बेकायदा उभ्या वाहनांवर टोईंगची कारवाई सुरू केली असून यापुढे नियमित कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
काळाखडक चौक हा वर्दळीचा प्रमुख केंद्र आहे. तरीही अनेक व्यावसायिक व वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत आहेत. दुकानांबाहेर रस्त्यांवर उभ्या चारचाकी वाहने, दुचाकी आणि रिक्षा यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. वापरातील रस्ता अरुंद होऊन अपघातांचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे या परिसरात गेल्या काही दिवसांत वाहतूक पोलिसांनी पाहणी करत टोईंग कारवाई केली. या कारवाईत सुमारे २० वाहनांना टॉईंग केले गेले. प्रत्येक वाहनासाठी पाचशे ते हजार रुपये दंड आकारण्यात आला. याशिवाय, टोईंग शुल्क अतिरिक्त आकारले जात आहे. वाहने पोलिस ठाण्यातून मुक्त करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
नियमित तपासणीत वाढ
वाहतूक विभागाने स्पष्ट केले की, दुकानदारांनी स्वतःच्या जागेत पार्किंग व्यवस्था करावी आणि सुरक्षा रक्षक नेमावा. या कारवाईचा उद्देश वाहतूक सुरळीत करणे असून पोलिसांनी सीसीटीव्ही आणि ई-चलन प्रणालीचा वापर करून नियमित तपासणी वाढवली आहे. नागरिकांनी पार्किंग नियमांचे पालन करावे आणि वाहतूक कोंडी टाळावी, असे आवाहन वाहतूक पोलिस विभागाने केले आहे.
आयटी पार्क हिंजवडीकडे जाणारा अतिशय वर्दळीचा हा रस्ता आहे. एका बाजूला रस्ता रुंदीकरण सुरू आहे. तरीही काही व्यावसायिक उद्दामपणा करून वाहने रस्त्यात उभी करतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. सातत्याने ती केली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेऊन आपल्यावरील कारवाई टाळावी.
- मधुकर थोरात, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वाकड वाहतूक विभाग
WKD25A09510