Mumbai Goa Highway Accident : ब्रेक निकामी अन् ट्रकने केला आठ वाहनांचा चुराडा, भीषण अपघातात तरुण ठार, मुंबई - गोवा महामार्गावरील घटना
esakal September 19, 2025 11:45 AM

Truck Crushes Vehicles Accident : कोळसा वाहतूक करणाऱ्या १६ चाकी ओव्हरलोड ट्रकने मुंबई - गोवा महामार्गावरील हातखंबा येथील उतारावर आठ वाहनांचा चुराडा केला. त्यात चार मोटारींसह तीन दुचाकी व रिक्षाचा समावेश आहे. या भीषण अपघातात झरेवाडी येथील शिवम रवींद्र गोताड (वय १९) हा विद्यार्थी जागीच ठार झाला. चुराडा झालेल्या मोटारीमधून प्रवास करणारे रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे बालंबाल बचावले. हा अपघात बुधवारी (ता. १७) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास झाला.

निवळी येथून गोव्याच्या दिशेने कोळसा वाहतूक करणारा १६ चाकी ट्रक (केए २९ सी १८४३) हातखंबा गावात असलेल्या तीव्र उतारावर जात असताना ब्रेक निकामी झाल्याने ट्रकने समोरील आठ वाहनांचा चुराडा करत ट्रक पुलाच्या संरक्षक कठड्यावर आदळला. आयटीआयमधून शिक्षण आटोपून दुचाकीवरून निघालेल्या शिवम रवींद्र गोताड याच्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने तो जागीच ठार झाला.

सायंकाळची वेळ असल्याने नोकरी, आयटीआयमधून घरी परतणारे प्रवासी चारचाकी, दुचाकी, रिक्षातून प्रवास करत होते. अवजड वाहनांच्या गर्दीमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होती. सर्व वाहने एकामागोमाग एक सावकाश पुढे जात असताना भरधाव ट्रकने या वाहनांचा चुराडा केला. मोटारी, दुचाकी सुमारे २०० मीटर फरफटत घेऊन गेला. ट्रकने सर्वच वाहनांना मागून धडक दिल्याने सर्व वाहने एकमेकांवर जोरदार आदळली. यामध्ये चार मोटारींचा चुराडा झाला. सुदैवाने यातील सर्व जण बालंबाल बचावले.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, निरीक्षक राजेंद्र यादव, उपनिरीक्षक धुमसकर यांच्यासह हातखंबा वाहतूक मदत केंद्राच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मृत झालेल्या शिवम गोताड याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवला. तर अन्य वाहनचालक, प्रवासी किरकोळ जखमी झाले होते.

या त्या अपघातग्रस्त ८ गाड्या

रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयवंत करपे शासकीय काम आटोपून राजापूर येथे कामानिमित्त जात होते. अचानक त्यांच्या मोटारीवर ट्रकने धडक दिल्यानंतर त्यांची मोटार समोरील मोटारीव आदळली. क्षणार्धात एअर बॅग उघडल्यामुळे श्री. करपे बालंबाल बचावले. अपघातात डॉ. महेश महाले यांची मोटार, मंगेश नागले यांची रिक्षा, कृष्णदेव भरत येडगे, अविनाश विजय ठाकरे (रा. लांजा) यांची मोटारसायकल तर लांजा येथील ॲड. समीर दळवी, डॉ. सुदेशकुमार शिवाजीराव चव्हाण प्रवास करत असलेली मोटार, संग्राम विलास साळवी (रा. नाचणे) यांची मोटार, तर सत्यविनायक सुरेश देसाई यांच्या मोटारीला ट्रकने धडक दिली.

चौघांचा बळी

मुंबई-गोवा महामार्गावर याआधी झालेल्या अपघाताच्या ठिकाणीच पुन्हा अपघात झाला. त्यामुळे हा तीव्र उतार अपघाताचे ठिकाण बनला आहे. आतापर्यंत येथे चौघांचा बळी गेला आहे.

Kolhapur Bhakt Niwas Scam : भक्त निवास म्हणून दाखवल्या शाळेच्या खोल्या, निधीचा गैरवापर; माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती, मुख्य सूत्रधार कोण?

पुलाचे रखडलेले काम अन् अपघात

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा गावात पुलाचे काम रखडले आहे. तीव्र उतारावरून वाहने पुढे जाताना ब्रेक फेल होणे, चालकाचे नियंत्रण सुटणे यामुळे अपघात होत आहेत. पुलाचे काम पूर्ण झाल्यास तीव्र उतार पूर्णतः नष्ट होणार आहे. ठेकेदाराने कामाची गती वाढवून पुलाचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. महामार्ग ठेकेदारी अजून किती जणांचे बळी घेणार आहे. असा थेट सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.