शिरूर, ता. १८ : पाबळ-शिरूर रस्त्यावर आमदाबाद (ता. शिरूर) गावच्या हद्दीत हॉटेल विश्वजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. १७) दुपारी चारच्या सुमारास घडली. परमेश्वर माणिक माळी (वय ३० मूळ रा. माळीवाडी ता.जि. बीड, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदाबाद गावच्या हद्दीत मलठणकडून जाणारा पिकअप क्र. (एमएच ४२- एक्यू ५४८६) व दुचाकी क्र. (एमएच १२- जेएल २१५५) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी माणिक गोविंद माळी (रा. माळीवाडी, ता.जि. बीड) शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सुनील कोंडिबा देवकाते (रा. लोणारवाडी, ता. दौंड, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अनिल आगलावे करीत आहे.