छत्रपती संभाजीनगर : राज्यातील बी.फार्मसी व फार्म.डी. अभ्यासक्रमांसाठी २०२५-२६ शैक्षणिक वर्षाच्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेचे (कॅप) वेळापत्रक जाहीर झाले असून, चारही फेऱ्यांसह संस्था स्तरावरील प्रवेशांचेही नियोजन करण्यात आले आहे.
उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी १४ सप्टेंबरला प्रसिद्ध झाली. मात्र, कॅप राउंड जाहीर झाले नव्हते. अखेर गुरुवारी (ता. १८) वेळापत्रक जाहीर झाले. सीट मॅट्रिक्स २० सप्टेंबरला जाहीर होणार आहे.
पहिली प्रवेश फेरी : ऑनलाइन पर्याय अर्ज व पुष्टी २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान होईल. २५ सप्टेंबरला तात्पुरती जागावाटप यादी जाहीर होईल. जागा स्वीकारण्याची मुदत २६ ते २८ सप्टेंबर दुपारी तीनपर्यंत असून, प्रवेश निश्चिती २६ ते २८ सप्टेंबर सायंकाळी पाचपर्यंत करावी लागेल.
दुसरी प्रवेश फेरी : २९ सप्टेंबरला रिक्त जागांची यादी जाहीर होईल. ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान पर्याय अर्ज स्वीकारले जातील. ५ ऑक्टोबरला जागावाटप यादी प्रसिद्ध होईल. जागा स्वीकारणे ६ ते ८ ऑक्टोबर दुपारी ३ पर्यंत, प्रवेश पुष्टी ६ ते ८ ऑक्टोबरला करता येईल.
तिसरी प्रवेश फेरी : ९ ऑक्टोबरला रिक्त जागांची यादी प्रसिद्ध होईल. १० ते १३ ऑक्टोबरदरम्यान पर्याय अर्ज करण्यासाठी मुदत असून, १५ ऑक्टोबरला जागावाटप जाहीर होईल. जागा स्वीकारणे १६ ते १८ ऑक्टोबर दुपारी ३ पर्यंत, प्रवेश निश्चिती १६ ते १८ ऑक्टोबरला करता येईल.
Education News: बीई, बीटेकचे ५२ टक्के प्रवेश; चौथ्या फेरीसाठी गुरुवारपासून पर्याय नोंदणीचौथी फेरी : १९ ऑक्टोबरला रिक्त जागांची यादी प्रसिद्ध होईल. २० ते २४ ऑक्टोबरदरम्यान पर्याय अर्जासाठी मुदत आहे. २७ ऑक्टोबरला जागावाटप जाहीर होईल. जागा स्वीकारणे २८ ते ३० ऑक्टोबर दुपारी ३ पर्यंत, प्रवेश निश्चिती २८ ते ३० ऑक्टोबरला करता येईल.
संस्था स्तरावरील प्रवेश : संस्था स्तरावरील पर्याय अर्ज २० सप्टेंबर ते २७ ऑक्टोबरपर्यंत स्वीकारले जातील. १ नोव्हेंबरला उमेदवारांची यादी संबंधित संस्थेकडे हस्तांतरित केली जाईल. १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान संस्थांना रिक्त जागा जाहीर करून जाहिरात द्यावी, अर्ज मागवून गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची कट-ऑफ तारीख ७ नोव्हेंबर असून शुल्कासह जागा रद्द करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर आहे.