RAT१९P१२ ः
२५N९२६१९
पुर्येतर्फे देवळे येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार किरण सामंत.
गावकऱ्यांच्या अडचणी गावातच सोडवा
किरण सामंत ः पुर्येतर्फे देवळेत गावभेट कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १९ ः कोणत्याही शासकीय योजनांपासून येथील पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत व तुमच्या अडचणी मला सांगा मी त्या सोडवेन, असे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी पुर्येतर्फे देवळे येथील गावभेट कार्यक्रमात केले.
देवळे येथील दौऱ्यात आमदार सामंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत गावातील विविध समस्या व विकासाच्या गरजा जाणून घेतल्या. पुर्ये येथील ग्रामस्थांनी लाडकी बहीण योजना, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण तसेच शासकीय योजनांबाबत अडचणी मांडल्या. आमदार सामंत यांनी काही प्रश्नांना तत्काळ तोडगा काढत उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. या वेळी महावितरण, आरोग्य विभाग, कृषी, वनखाते, पंचायत समिती, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांना छोट्या-छोट्या अडचणींसाठी तालुक्यापर्यंत धाव घ्यावी लागू नये. गावातील जनतेचे प्रश्न गावातच सोडवा यासाठी ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी आणि इतर शासकीय अधिकारी यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे, अशी सूचना आमदार सामंत यांनी दिली.
पुर्ये येथील ग्रामस्थांना देवळे प्राथमिक आरोग्यकेंद्राऐवजी साखरपा प्राथमिक आरोग्यकेंद्राजवळ असल्यामुळे या ठिकाणी रुग्णांची सोय व्हावी, अशी विनंती आमदार सामंत यांना केली. आमदार सामंत यांनी ताबडतोब यावर तोडगा काढला. पुर्येतर्फे देवळे ग्रामपंचायत उपसरपंच बापू लोटणकर यांनी स्वतः लक्ष घालून ग्रामस्थांच्या समस्या सोडवाव्यात, असा सल्ला सामंत यांनी दिला. या वेळी शिष्यवृत्ती स्पर्धेमध्ये राज्यामध्ये नववा आलेला आरूष चव्हाण, प्रकाश माने, विजय पवार, मोहन चव्हाण यांचा सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी विलास चाळके, राजू कुरूप, जया माने, राजेश पत्याणे, संजय सुर्वे, राजेश कामेरकर, रमजान गोलंदाज, मुन्ना खामकर, सरपंच गार्डी, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.