Doctors Protest: रुग्णांचे हाल, शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या; डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्यसेवेवर परिणाम, एमएमसी प्रक्रियेला विरोध
esakal September 20, 2025 02:45 PM

छत्रपती संभाजीनगर : होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली. या निर्णयाला आयएमएने तीव्र विरोध दर्शवला. त्यामुळे शहरातील तब्बल ५५० खासगी रुग्णालयांची ओपीडी बंद राहिली.

सरकारी, खासगी आणि पालिका रुग्णालयांत केवळ आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आल्या. पण, बाकी सर्व सेवा ठप्प झाल्याने रुग्णांना असुविधेला सामोरे जावे लागले. आयएमएचे शेकडो डॉक्टर क्रांती चौकात उतरले. मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात निदर्शने केली. घोषणाबाजी, फलक आणि बॅनर घेऊन त्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नेतृत्वाखाली डॉक्टरांनी गुरुवारी (ता. १८) सकाळी आठपासून राज्यव्यापी संप पुकारला. या आंदोलनामुळे राज्यातील सर्व सरकारी, खासगी आणि पालिका रुग्णालयांमधील आरोग्यसेवा ठप्प झाल्या. छत्रपती संभाजीनगरातील सुमारे ५५० खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद राहिल्याने शेकडो रुग्णांना उपचाराविना परतावे लागले. रुग्ण तपासणी झाली नाही. त्यामुळे रुग्णांना असुविधेला सामोरे जावे लागले.

आयएमएच्या म्हणण्यानुसार, होमिओपॅथीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचाराचे प्रशिक्षण नसते. अशा डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचार करण्याची परवानगी दिल्यास रुग्णांच्या जिवाला धोका पोचू शकतो. हे रुग्णांच्या आयुष्याशी खेळण्यासारखे आहे. शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी केली. दरम्यान, आजारी रुग्ण सकाळपासून रुग्णालयांच्या दारात उभे राहिले.

पण, आत जाऊन डॉक्टरांकडे उपचार घेणे शक्यच झाले नाही. संपाचा सर्वाधिक फटका शस्त्रक्रिया होणाऱ्या रुग्णांना बसला. शहरात सुमारे २०० लहान-मोठ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे डॉ. सत्यजित पाथ्रीकर यांनी सांगितले. दरम्यान, प्रकृती खराब आहे, अशा रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (घाटी), कर्करोग रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात दिलासा मिळाल्याचे दिसून आले. आपत्कालीन विभाग, आयसीयू यांसारख्या ठिकाणी रुग्णांना सेवा देण्यात आल्याचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर... क्रांती चौकात आयएमएची निदर्शने

आयएमएच्या डॉक्टर क्रांती चौकात घोषणाबाजी, फलक आणि बॅनर घेऊन त्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. रुग्णांचा जीव धोक्यात घालू नका, होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीमध्ये प्रवेश नाही अशा घोषणा देत डॉक्टरांनी शासनाचे लक्ष वेधले. आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर, डॉ. योगेश लक्कस, डॉ. यशवंत गाडे, डॉ. उज्ज्वला दहिफळे, डॉ. संतोष रंजलकर, डॉ. राजेंद्र गांधी, डॉ. गितेश दळवी, डॉ. प्रतिमा भाले, डॉ. आसावरी टाकळकर, डॉ. सोनाली सावजी, डॉ. दत्ता कदम, डॉ. अर्चना साने, डॉ. जितेन कुलकर्णी, डॉ. अनंत कुलकर्णी, डॉ. प्रसन्न मिस्त्रीकोटकर, डॉ. सरताज पठाण, डॉ. प्रवीण सोनवतीकर, डॉ. आशा उनवणे, डॉ. बाबासाहेब उनवणे, डॉ. अभय पोहेकर यांच्यासह मोठ्या संख्येने डॉक्टरांनी सहभाग नोंदविला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.