Insurance like a Online Shopping : देशातील विमा नियामक संस्था IRDAI ने देशातील कोट्यवधी विमा ग्राहकांना आनंदवार्ता दिली आहे. इरडाने विमा सुगम पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली आहे. ग्राहकांना आता जीवन,आरोग्य आणि वाहन विमा एकाच पोर्टलवर खरेदी करता येईल. विशेष म्हणजे त्यांना विमा खरेदी करताना अनेक पर्यायांपैकी जो योग्य वाटतो तो निवडता येईल. अनेक कंपन्यांचे विविध विमा पॉलिसी एकाच प्लॅटफॉर्मवर दिसतील. त्यातून तुलनात्मक जी पॉलिसी चांगली वाटते ती ग्राहकांना निवडता येईल. या प्लॅटफॉर्मवरून ग्राहकांना क्लेम सेटलमेंट आणि विमा पॉलिसीचे नुतनीकरण पण करता येईल. अशा सरकारी साईटची अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. अखेर एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यास इरडाने होकार भरला आहे. विशेष म्हणजे या वर्षाअखेरीसच ही साईट आणि याविषयीचे ॲप दाखल होईल.
सहा महिने झाला उशीर
GIC च्या अहवालानुसार, विमा सुगम या नावाने हे पोर्टल आणि ॲप लाँच होईल. हा प्लॅटफॉर्म या वर्षी एप्रिल महिन्यात ग्राहकांसाठी उपलब्ध होणार होता. पण त्याला जवळपास 6 महिन्यांहून अधिकचा उशीर झाला आहे. या सुविधा टप्प्याटप्प्याने लागू होतील. बोर्ड अप्रुव्ह रोडमॅप अंतर्गत पुढील महिन्यात विमा कंपन्या आणि इकोसिस्टिम सहभागीदार यासाठी एकीकृत धोरण पुढे नेतील. त्यानंतर बाजारात खऱ्या अर्थाने व्यवहार सुरू होईल.
काय आहे विमा सुगम?
विमा सुगम हे वन स्टॉप सोल्यूशन्स असेल. यातंर्गत जितक्या विमा कंपन्या आहेत, त्या एकाच प्लॅटफॉर्मवर येतील. त्यांचे विविध प्रकारचे विमा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. यामध्ये जीवन विमा, आरोग्य विमा आणि वाहन विमा एकाच ठिकाणी उपलब्ध असतील. यापैकी ग्राहकांना कोणताही एक निवडता येईल. त्यांना या विम्यामध्ये तुलना करता येईल. जिथे पैशांची बचत आणि चांगल्या सुविधा मिळतील ती कंपनी निवडता येईल. यासाठी जीवन विमा परिषद आणि सामान्य विमा परिषदेने होकार दिला आहे. विमा सुगम भारत परिषदेने (bima sugam India federation) या सुविधेबद्दल उत्सुक असल्याचे आणि ग्राहकांसाठी हा एकखिडकी कार्यक्रम असल्याचे म्हटले आहे.