Backward Walking Trend: उलटं चालण्याचा नवा ट्रेंड का होतोय लोकप्रिय? जाणून घ्या फायदे
Marathi September 20, 2025 07:26 PM

आरोग्यदायी जीवनशैलीसाठी लोक योग, व्यायाम, धावणे आणि सकाळी चालण्याचा अवलंब करतात. चालणं हे नेहमीच फायदेशीर मानलं जातं. पण आता जगभरात एक वेगळा ट्रेंड लोकप्रिय होत आहे तो म्हणजे उलटं चालणं. उद्यानात किंवा रस्त्यावर अनेकदा लोकांना सरळ चालण्याऐवजी मागे चालताना पाहिलं असेल. हे फक्त गंमत म्हणून नाही, तर आरोग्यासाठी उपयुक्त आहे. (backward walking health benefits)

उलट चालण्याचे फायदे

मेंदू आणि पायांचा व्यायाम : मागे चालल्याने मेंदूला नवा सिग्नल मिळतो. त्यामुळे पाय आणि मेंदूमध्ये विशेष समन्वय निर्माण होतो.

डायबेटीस आणि बीपीसाठी फायदेशीर : नियमित उलटं चालल्यास रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

पायांना बळकटी : मागे चालल्याने पायांमध्ये ताकद वाढते आणि स्नायूंना मजबुती मिळते.

वजन कमी करण्यास मदत : ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी ही एक प्रभावी पद्धत ठरू शकते.

पाठदुखीपासून आराम : पाठीच्या दुखण्याने त्रस्त असणाऱ्यांसाठीही हा व्यायाम फायदेशीर ठरतो.

किती वेळ चालावे?

उलट चालायला सुरुवात करायची असेल तर दिवसातून केवळ पाच मिनिटे पुरेशी आहेत. सुरुवातीला हळूहळू मागे चालण्याचा प्रयत्न करा, कारण तोल सांभाळणे महत्त्वाचे आहे. काही दिवसांनी सवय झाली की चालण्याचा वेग आणि वेळ दोन्ही वाढवू शकता. मात्र नेहमी सपाट जागेवर चालावे, पाठीमागे दगड, खड्डे किंवा अडथळे नाहीत याची खात्री करूनच उलटं चालावं.

ज्यांना पाय किंवा गुडघ्यांच्या समस्या आहेत, अशांनी ही पद्धत टाळावी. अन्यथा ही साधी पण वेगळी चालण्याची पद्धत शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त ठेवू शकते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.