मणिपूरात आसाम रायफल्सच्या जवानांवर गोळीबार, दोन ठार तर पाच जखमी
Tv9 Marathi September 20, 2025 05:45 PM

मणिपूरमध्ये आसाम रायफल्स जवानांच्या तुकडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. निमलष्करी दलाचे वाहन या जवानांना घेऊन जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी या वाहनावर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात किमान दोन जवानांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

मणिपूर येथील बिष्णूपूर जिल्ह्यातील नम्बोल सबाल नाईकाई भागात निमलष्करी दलाच्या वाहनातून आसाम रायफल्स जवानांच्या तुकड्या जात असतान शुक्रवारी सायंकाळी हल्लेखोरांनी वाहनावर घात लावून गोळीबार केला.या गोळीबारात दोन जवान जागीच ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत.

अज्ञात हल्लेखोरांनी केला गोळीबार

संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ३३ आसाम रायफल्सच्या तुकडीचा एक तुकडा त्यांच्या पतसोई कंपनी ऑपरेटिंग बेसवरून नंबोल कंपनी ऑपरेटिंग बेसकडे जात असताना मणिपूरच्या डीनोटिफाइड क्षेत्रातील महामार्गावर नंबोल सबल लीकाईच्या सामान्य भागात अज्ञात दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या गोळीबारात दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत.त्यांच्यावर उपचार सुरु आहे. हल्लेखोर नेमके कोणत्या गटाचे होते हे समजू शकलेले नाही.

अद्याप कोणत्याही गटाने जबाबादारी घेतलेली नाही

या हल्ल्यात आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले असून पाच जखमी झाले आहेत. जखमींना इंफाळमधील प्रादेशिक वैद्यकीय विज्ञान संस्थेत (RIMS) हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. आतापर्यंत कोणत्याही अतिरेकी वा बंडखोर गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे, असे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.

एका पोलिस अधिकाऱ्याने आधी सांगितले होते की, मोठ्या प्रमाणात शस्त्रे असलेल्या एका गटाने राजधानी इंफाळहून बिष्णुपूर जिल्ह्याकडे निघालेल्या आसाम रायफल्सच्या जवानांच्या वाहनावर हा मोठा हल्ला केला, ज्यामध्ये दोन जवान शहीद झाले आहेत आणि पाच जण जखमी झालेले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.