पिंपरी, ता. २० ः उद्यान आहे पण हिरवळ नाही, वॉकिंग ट्रॅक आहे, पण चाललात तर पडाल, खेळणी आहेत पण खेळता येत नाहीत...हे कमी की काय म्हणून येथे सापही दिसले आहेत...ही भयावह स्थिती आहे मोरवाडीतील श्रीमती देऊबाई कापसे उद्यानाची....महापालिकेच्या उद्यान विभागाने तब्बल सात वर्षे दुर्लक्ष केलेले हे उद्यान कात केव्हा टाकणार अशी स्थानिक नागरिकांना प्रतिक्षा आहे.
मोरवाडी, म्हाडा वसाहत, अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, वास्तूउद्योग आदी परिसरातील नागरिकांना पर्याय नसल्याने अशा दुरवस्था झालेल्या उद्यानात येण्याशिवाय पर्याय नाही. प्रवेश केल्यानंतर वाटणारी आकर्षक रचना अखेरीस भ्रमनिरास करते. बच्चेकंपनीचे आवडते ''मेरी गो-राउंड'' खराब झाले आहे.
एका बाजूला गवत वाढले आहे, तर दुसऱ्या बाजूला हिरवळ नाहीशी झाली आहे. काही ठिकाणी कचरा जाळला जातो. महिला व पुरुषांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाचीही दुरवस्था झाली आहे. पाण्याची सोय नाही. स्वच्छतागृहाचे दरवाजे तुटलेले आहेत. वॉकिंग ट्रॅकवरील ब्लॉक काही ठिकाणी निखळले आहेत. खेळण्यांच्या आजूबाजूला वाळू नसल्याने पावसाचे पाणी साचून लहान मुले घसरून पडतात. काही ठिकाणी फरश्या उखडल्या आहेत. झाडांभोवती बसण्यासाठी केलेल्या कट्ट्यांना तडे गेले आहेत. उद्यानाची एक बाजू तारांचे कुंपण घालून बंद असली तरी नागरिक त्यातूनच ये-जा करतात. शेजारी असलेल्या जागेतील झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम काही नागरिक उद्यानातच करतात.
उद्यानात पाच ते सहा शोभेच्या कमानी आहेत, पण त्याचे सांगाडेच उरले आहेत. त्यावरील वेल सुकले आहेत. खाली पालापाचोळा जमला आहे. हीच अवस्था दोन झोपाळ्यांची झाली आहे. तेथे केवळ दोन खांब उरले आहेत.
योगासन खोलीची दुरवस्था
उद्यानात योगासनासाठी खोलीची सोय करण्यात आली आहे, पण तेथेही दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांसाठी ती निरुपयोगी ठरली आहे.
---
या उद्यानात शोभेसाठी उभारण्यात वस्तूंची दुरवस्था झाली आहे. खेळणी नावापुरती शिल्लक आहेत. अनेक खेळणी तुटली आहेत. त्यांचा वापर मुलांच्या जिवावरही बेतू शकतो. एकूणच या उद्यानाला अवकळा आली आहे.
- बी. आर. माडगुळकर, ज्येष्ठ नागरिक, मोरवाडी
---
या उद्यानाकडे महापालिकेच्या उद्यान विभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी आम्हा नागरिकांची मागणी आहे. उद्यानातील काही दिवे बंद आहेत. उद्यानात पावसाचे पाणी साचल्यामुळे येथे येणाऱ्यांचे हाल होतात. योगासन खोलीची दुरवस्था होऊन ती मोडकळीस आली आहे.
- हनुमंत गुब्याड, म्हाडा कॉलनी, मोरवाडी
---
कापसे उद्यानाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दुरुस्ती आणि स्वच्छता करण्याबाबत निरीक्षकाला सांगण्यात येईल. उद्यानातील समस्या लवकर सोडविण्यात येतील.
- राजेश वसावे, अधिक्षक, उद्यान विभाग
---