Gor Banjara Community: बंजारा समाजाचा कन्नडला एल्गार; एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मोर्चाद्वारे मागणी
esakal September 21, 2025 02:45 AM

कन्नड : हैदराबाद गॅझेटियरनुसार राज्यातील गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील सकल गोर बंजारा समाजातर्फे सोमवारी (ता.१९) एल्गार मोर्चा काढण्यात आला.

हजारोंच्या संख्येने गोर बंजारा समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. त्यांनी पारंपरिक वेशभूषा धारण करत पारंपरिक नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

तरुणांनी देखील हलकीच्या तालावर हातात संत सेवालाल महाराजांचा पांढरा ध्वज घेऊन नृत्य केले. सुरवात शहरातील गिरणी ग्राउंड येथून झाली. हिवरखेडा नाका, पिशोर नाका, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक मार्गे मोर्चा घोषणा देत तहसील कार्यालयासमोर आला.

येथे बंजारा समाजाच्या महंतांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमापूजन झाले. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. महंत जितेंद्र महाराज, महंत सुनील महाराज, ऋषिकेश चव्हाण, वीरा राठोड, आकांक्षा चव्हाण यांनी मनोगतातून शासनाला इशारा देत म्हटले की, ‘महिनाभरात मराठा समाजाप्रमाणेच बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेट लागू केले नाही, तर मुंबईतील आझाद मैदानावर मोठा मोर्चा काढला जाईल.

Gor Banjara Community March : गोर बंजारा समाजाच्या कन्नडमधील भव्य एल्गार मोर्चातून एसटी प्रवर्गातुन आरक्षणाची मागणी

’ तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी समाजाच्या महंत व युवतींच्या हस्ते मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी पोलिस निरीक्षक रघुनाथ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.