आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीतल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला चिरडलं होतं. या सामन्यात भारताने 7 गडी राखून विजय मिळवला होता. तसेच हँडशेक न करता भारतीय संघाने दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तान आणि त्यांच्या संघाला जागा दाखवून दिली होती. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. सुपर 4 फेरीत 21 सप्टेंबरला या दोन्ही संघात सामना होणार आहे. पण या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघ भीतीने थरथरत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची भीती सतावत आहे. युएईविरुद्धची रणनिती पुन्हा एकदा त्यांनी अवलंबली आहे. भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वीची पत्रकार परिषद पाकिस्तानने रद्द केली. तसेच पाकिस्तानचा संघ मोटिवेशनल स्पीकरच्या शरणी गेला असल्याची माहिती आहे. पाकिस्तानच्या या स्थितीमुळे त्यांच्या संघाचे चाहते संभ्रमात पडले आहेत.
भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंची मानसिक स्थिती ढासळली आहे. त्यातून सावरण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोटिवेशनल स्पीकर डॉ. राहील यांना बोलावलं आहे. यामुळे खेळाडूंची मानसिक स्थिती सुधारेल असं पीसीबी वाटत आहे. दुसरीकडे, मानसिक स्थिती ढासळल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू विचित्र वागत असल्याचं दिसत आहेत. अँडी पायक्रॉफ्टवर काय बिल फाडतात? युएईविरुद्धचा सामना खेळणार नाही म्हणून सांगतात. तसेच पत्रकार परिषदाही रद्द करत आहेत. त्यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर लाज निघत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची प्रत्येक भूमिकेत धरसोड वृत्ती दिसत आहे.
सुपर 4 फेरीतील भारत पाकिस्तान सामन्यात सामनाधिकाऱ्याची भूमिका पुन्हा एकदा अँडी पायक्रॉफ्ट बजावणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानची पुरती लाज निघाली आहे. युएईविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्यांनी अँडी पायक्रॉफ्ट यांनी हटवण्याची मागणी केली होती. पण तसं काही झालं नाही. मग सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लाज सोडत पुन्हा सामना खेळण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नाटकीपणामुळे हा सामना एक तास उशिराने सुरु झाला होता. आता पाकिस्तान काय नवं नाटक करतंय याकडे लक्ष लागून आहे.