मध्य प्रदेशातील एका भाजप नेत्याच्या मुलानं कर्जातून सुटका करून घेण्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला. पण त्याचं हे नाटक फार काळ टिकलं नाही. विशाल सोनी असं स्वत:च्या मृत्यूचा बनाव केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर १.४० कोटी रुपयांचं कर्ज होतं. कर्ज फेडता येत नसल्यानं त्यांनं आपली गाडी कालीसिंध नदीत ढकलून दिली. त्यानंतर तो महाराष्ट्रात शिर्डी-शनीशिंगणापूर या परिसरात फिरत होता. पोलिसांना याची कुणकुण लागली. पोलीस त्याचा माग काढतायत हे कळताच त्यानं अपहरण झाल्याचं सांगत पोलीस ठाणं गाठलं. पण पोलिसांना आधीच त्याचा कारनामा माहिती असल्यानं पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर त्यानं पोलिसांसमोर सांगितलं की, कर्जाच्या विळख्यात अडकल्यानं स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला.
डोक्यावर असलेला कर्जाचं एक ओझं कमी करण्यासाठी दुसरं कर्ज, उत्पन्न कमी असताना अधिक कर्ज घेतल्यानं त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला. असा कर्जाचा डोंगर आपल्यावर होऊ नये यासाठी आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे. कर्जबाजारीपणामुळे अनेकदा लोक टोकाचं पाऊल उचलतात. अशा घटनांमधून धडा घेऊन आपण कर्ज टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. कर्ज घेतलं तरी आपण फेडू शकू इतक्याच प्रमाणात घ्यायला. आपला जमा-खर्चाचा हिशोब ठेवून कर्जाची उचल करणं कधीही योग्य ठरेल.
भारतीयांचं अमेरिकेत जाणं महागणार; H1 व्हिसा हवा असेल तर द्यावे लागणार ९० लाख; ट्रम्प यांचा निर्णय कर्ज टाळण्यासाठी पाच महत्त्वाच्या टिप्स१. जास्त कर्ज घेणं टाळा - जितकं कर्ज फेडू शकता त्यापेक्षा जास्त कर्ज घेणं टाळायला हवं. तुम्हाला मासिक वेतन जितकं मिळतं त्याच्या ५० टक्क्यापेक्षा जास्त रकमेचा कर्जाचा हफ्ता असणार नाही याची काळजी घ्या.
२. रिफायनान्सिंग - कर्जाचा हफ्ता जास्त वाटत असेल तर तुम्ही रिफायनान्सचा पर्याय वापरू शकता. यामुळे तुमच्या कर्जाच्या परतफेडीची मुदत वाढेल आणि मासिक हफ्ता कमी होईल. अर्थात यामुळे तुम्हाला अधिकचं व्याज भरावं लागेल. पण कर्जामुळे येणारा ताण कमी होईल.
३. बँक किंवा कर्ज देणाऱ्यासोबत बोला - हफ्ता भरण्यासाठी काही अडचणी असतील तर त्याबाबत बँक किंवा कर्ज देणाऱ्यासोबत बोला. तुमचा हफ्ता काही काळ थांबवण्याची विनंती करा. ठराविक वेळेनंतर हफ्ता पुन्हा देता येईल का? इतर पर्याय असतील तर चर्चा करा.
४. कमी व्याज दर - अनेकदा कर्जाची रक्कम कमी असते आणि लगेच कर्ज मिळते म्हणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. पण शक्यतो कमी व्याजदर असलेल्या बँकेतून कर्ज घेण्याचा प्रयत्न करा. तुमचं कर्ज कमी व्याजदर असणाऱ्या बँकेत हस्तांतरित करू शकता. यामुळेही तुमचा मासिक हफ्ता कमी होईल.
५. हफ्ते वेळेवर भरा - कर्जाचे हफ्ते वेळेवर भरल्यानं तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला राहतो. शिवाय वेळच्या वेळी कर्जाची परतफेड केल्यानं अतिरिक्त व्याजाचा बोजा पडत नाही आणि तुम्ही कर्जाच्या विळख्यात सापडत नाही.