पुणे : पुणे शहरातील पाणीपुरवठ्यात १० टक्क्यांनी कपात करावी, खडकवासला जॅकवेल येथील पंपिंग स्टेशन आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेसोबत झालेल्या बैठकीत केली. मात्र, महापालिकेने पाणी कपातीचा तसेच जॅकवेल ताब्यात देण्याचा प्रस्ताव थेट धुडकावून लावत कपात करणे अशक्य आहे, असे पाटबंधारे विभागाला स्पष्ट केले. त्यातच महापालिका आयुक्त नवल किशोर राम बैठकीस उपस्थित राहिले नाहीत.
पुणे शहराची हद्दवाढ झाली आहे, मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असल्याने निवासी भागांतही वाढ होत आहे. शिवाय जुनी हद्दी, नवी हद्द, तरंगती लोकसंख्या अशी एकूण पुणे शहराची लोकसंख्या ८४ लाखापर्यंत गेली आहे. त्यामुळे पुणे शहराची तहान वाढलेली आहे. महापालिकेने २०२५-२६ या वर्षासाठी पाटबंधारे विभागाकडे २१ टीएमसी पाण्याची मागणी केली होती. पण पाटबंधारे विभागाने केवळ १४.६१ टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर केला आहे.
महापालिका मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरत असल्याने त्यावर पाटबंधारे विभागाकडून आक्षेप घेतला जात आहे. जलसंपत्ती नियामक आयोगाच्या आदेशानुसार पाणी वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी खडकवासला येथील जॅकवेलचे नियंत्रण पाटबंधारे विभागाकडे द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (ता. १९) महापालिकेत बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप उपस्थित होते, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके उपस्थित होते.
Pune News : पैशांसाठी केले ‘इमोशनल ब्लॅकमेल’! नोकरीत कायम होण्याच्या आशेने मंगळसूत्र विकले अन् ७५ हजार भरलेपुणे शहराची पाण्याची गरज वाढलेली आहे. जर १० टक्के पाणी कपात केली तर सध्याचे असलेले वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून जाईल. तसेच जॅकवेलचे नियंत्रणही महापालिका तुमच्या ताब्यात देणार नाही असेही स्पष्ट केले. त्यावर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला ही भूमिका लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली. तसेच या बैठकीत महापालिकेने शहरासाठीचा पाणी कोटा वाढवून देण्याची मागणी केली. त्यास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोटा वाढवून मिळणार नाही. तुम्ही पाण्याची काटकसर करा असे सांगितले. दरम्यान या बैठकीसाठी महापालिका आयुक्त उपस्थित राहणार होते. पण पाटबंधारेची भूमिका ही मान्य नसल्याने आयुक्त राम या बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. अतिरिक्त आयुक्त चंद्रन यांनी ही बैठक घेतली.
आयुक्त राम म्हणाले, ‘‘पाटबंधारेचे अधिकारी बैठकीसाठी आले होते. त्यांनी १० टक्के पाणी कपात, जॅकवेलचे हस्तांतर यास आम्ही नकार दिला आहे.’’
ऐन निवडणुकीपूर्वी पाणी तापणार
पुणे महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाने महापालिकेकडे पाणी कपातीचा तगादा लावला आहे. महापालिकेत प्रशासकराज असले तरी राज्यात महायुतीची सत्ता आहे. जलसंपदामंत्री हे भाजपचे आहेत. अजून पाऊस थांबलेला नाही, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आतापर्यंत मुठा नदीतून २५ टीएमसीपेक्षा जास्त पाणी उजनी धरणात वाहून गेलेले आहे. खडकवासला धरण प्रकल्पातील चारीही धरणे १०० टक्के भरलेली आहेत. तरीही पुणेकरांवर पाणीकपात लादली तर याची राजकीय किंमत राज्यातील सत्ताधाऱ्यांना मोजावी लागेल. दरम्यान, शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी पाणीकपातीला विरोध करत, यासंदर्भात आयुक्तांना निवेदन दिले आहे.