आशिया कप 2025 च्या शेवटच्या गट सामन्यात ओमानचा 21 धावांनी पराभव करून भारताने विजयाची हॅटट्रिक साकारली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 188 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना ओमानला फक्त 167 धावा करता आल्या. आता सुपर 4 फेरी आजपासून, म्हणजे 20 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. त्यामध्ये टीम इंडिया त्यांचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. मात्र त्यापूर्वी भारतीय संघाला मोठा फटका बसला आहे. कार ओमानविरुद्धच्या सामन्यात एका महत्वाच्या खेळाडूला दुखापत झाली असून त्यामुळे या खेळाडूच्या सामन्यातील सहभागाबाबत अनिश्चितता आहे.
टीम इंडियाच्या खेळाडूला गंभीर दुखापत
अबू धाबी येथे ओमान विरुद्धच्या ग्रुप ए सामन्यादरम्यान भारतीय अष्टपैलू अक्षर पटेलला गंभीर दुखापत झाली. ओमानच्या संघाच्या फलंदाजीदरम्यान पटेलच्या डोक्याला आणि मानेला दुखापत झाली. खरं तर, ओमानच्या डावाच्या 15 व्या षटकात, फलंदाज हमीद मिर्झाने मोठा शॉट मारला आणि अक्षर पटेलने मिड-ऑफवरून झेल घेण्यासाठी धाव घेतली, परंतु झेल घेताना त्याचा तोल गेला, ज्यामुळे त्याच्या डोक्याला आणि मानेला दुखापत झाली.
या घटनेनंतर, वेदनेने कण्हत असलेल्या अक्षरने फिजिओच्या मदतीने मैदान सोडले आणि ओमानच्या उर्वरित डावात तो परतला नाही, ज्यामुळे भारतीय संघाचे टेन्शन चांगलेच वाढले आहे. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत, भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी अक्षरच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. तो सध्या बरा आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र असे असले तरी रविवारी दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात तो खेळू शकेल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. हा सामना सुरू होण्यास 48 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे, जो बरा होण्यासाठी पुरेसा वेळ दिसत नाहीये. त्यामुळे, जर अक्सर वेळेत बरा झाला नाही, तर संघाला त्यांची रणनीती बदलावी लागू शकते. यामुळे टीम इंडियाच्या चिंतेत भर पडली आहे.
पर्यायी खेळाडू कोण ?
अक्षर पटेलच्या दुखापतीबाबत बीसीसीआय लवकरच निर्णय घेईल. जर तो स्पर्धेतून बाहेर पडला तर त्याच्या जागी दुसरा खेळाडू निवडला जाऊ शकतो. भारतीय संघात अष्टपैलू रियान पराग आणि वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू स्टँडबाय आहेत. त्यामुळे गरज पडल्यास यापैकी कोणत्याही खेळाडूला मुख्य संघात स्थान मिळू शकते.