आशिया 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता तर आहे. पण सामनाधिकाऱ्याची भूमिका कोण बजावणार याबाबतची चर्चा रंगली आहे. असं असताना ही जबाबदारी पुन्हा एकदा सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ आता काय करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, 21 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यात अँडी पायक्रॉफ्ट सामनाधिकाऱ्याची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. कारण अँडी पायक्रॉफ्ट यांच्या नियु्क्तीमुळे पाकिस्तानची पोटदुखी झाली आहे. पाकिस्तानने साखळी फेरीतील सामन्यातील हँडशेक प्रकरणासाठी अँडी पायक्रॉफ्ट यांना जबाबदार धरलं होतं. तसेच त्यांची स्पर्धेतून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.
अँडी पायक्रॉफ्ट हे पाकिस्तान आणि युएई सामन्यात सामनाधिकारी होते. त्यामुळे पाकिस्तानने त्यांची हकालपट्टी करण्याची नाटकी सुरु केली होती. सामना खेळणार नाही अशी भूमिका घेतली होती. आयसीसीकडे विनंती केली होती की, त्यांना या स्पर्धेतून बाहेर काढा. पण आयसीसीने पाकिस्तानच्या मागणीला केराची टोपली दाखवली. त्यामुळे पाकिस्तान बॅकफूटवर आला. त्यानंतर या प्रकरणावर अँडी पायक्रॉफ्ट यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर पाकिस्तान मान खाली घालून सामना खेळला. दुसरीकडे, पाकिस्तान मीडियातून दावा केला गेला की, अँडी पायक्रॉफ्ट यांनी माफी मागितली होती. त्यानंतर सामना सुरु झाला होता. पण पाकिस्तानचा हा दावाही खोटा निघाला होता.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. पण आयसीसी आणि आशिया मल्टी नॅशनल स्पर्धेत भारतीय संघ सामने खेळतो. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानशी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची नाचक्की झाली होती. यासाठी पाकिस्तानने अँडी पायक्रॉफ्ट यांना जबाबदार धरलं होतं. पीसीबीने दावा केला की पायक्रॉफ्टने सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आगा यांना टॉस दरम्यान हस्तांदोलन करू नये असे सांगितले होते .